नवी दिल्ली : भाजपप्रमाणे काँग्रेसमध्येही संघटनात्मक बदलाची सुरुवात झाली असून शुक्रवारी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांच्या जागी आमदार व माजी मंत्री वर्षां गायकवाड यांच्या नियुक्तीची घोषणा संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी केली. गुजरात व पुडुचेरीचेही प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आले आहेत.
काँग्रेसची सर्वोच्च निर्णय समिती असलेल्या नव्या कार्यकारिणीची स्थापना करण्यापूर्वी विविध राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष तसेच प्रभारी बदलाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. ‘एकला चलो’चा आग्रह धरणारे भाई जगताप यांची उचलबांगडी करून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाविकास आघाडीला पूरक बदलाचे संकेत दिल्याचे मानले जात आहे.
राज्यातील या बदलामुळे पुन्हा प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी विजय वड्डेटीवार वगैरे नेत्यांनी दिल्ली दौरा करून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केल्याचे सांगितले जाते. दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी खरगेंची भेट घेतली होती. खरगेंचे विश्वासू एच. के. पाटील कर्नाटकमधील सिद्धरामय्यांच्या सरकारमध्ये मंत्री झाल्यामुळे महाराष्ट्रासाठी काँग्रेसला नवे प्रभारीही नियुक्त करावे लागणार असून ही नियुक्तीही लवकरच केली जाणार आहे.
गुजरातमध्ये काँग्रेस अत्यंत कमजोर असून हार्दिक पटेल यांच्या भाजपप्रवेशामुळे पक्षाकडे एकही तगडा नेता उरलेला नाही. गुजरात विधानसभा निवडणुकीत जगदीश ठाकूर यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली होती. मात्र आता काँग्रेसने राहुल गांधींचे विश्वासू व राज्यसभेतील खासदार शक्तिसिंह गोहील यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे देण्यात आली आहेत. गोहील दिल्लीचे प्रभारी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप विरोधात अत्यंत कडवी व आक्रमक भूमिका घेणाऱ्या गोहीलांकडे गुजरात सोपवून काँग्रेसने भाजपला संदेश दिला आहे.
अन्य राज्यांतही बदलाचे वारे
आता राजस्थान, पश्चिम बंगाल, दिल्ली, झारखंड या राज्यांतही प्रदेश काँग्रेसमध्ये बदलाचे संकेत देण्यात आले आहेत. पुडुचेरीमध्ये ए. व्ही. सुब्रमणियन यांच्या जागी व्ही. वैतीिलगम यांची प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करून तामीळनाडूमधील बदलाची शक्यता दिसू लागली आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यातील विस्तव जात नसल्याने संपूर्ण प्रदेश समिती बदलली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पायलट नवा पक्ष स्थापन करण्याची जोरदार चर्चा सुरू असली तरी, तशी शक्यता वेणुगोपाल यांनी शुक्रवारी फेटाळली.