लोकसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. अशात भाजपाचे खासदार वरुण गांधी हे मोदी सरकारविरोधातच तिखट प्रश्नांच्या फैरी झाडत आहेत. एकीकडे भाजपा २०२४ मध्ये पीलभीतमधून वरुण गांधींना तिकिट देणार का? याच्या चर्चा रंगलेल्या असताना वरुण गांधी हे मात्र मोदी सरकारला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारताना दिसत आहेत. भाजपाच्या घोषणा, सरकारी नोकरी, योजना या सगळ्यावरच वरुण गांधी यांनी प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे त्यांना बहुदा तिकिट दिलं जाणार नाही असंच दिसतं आहे. कदाचित ते वेगळी चूल मांडू शकतात अशीही चर्चा आहे. ही चर्चा होण्याचं कारण म्हणजे त्यांनी मोदी सरकारवर टोकाची टीका केली आहे
काय म्हणाले वरुण गांधी?
वरुण गांधी म्हणाले, “मी भारत मातेला आपली माता मानतो. मी हनुमानाचा भक्त आहे, भगवान राम यांनाही मी देव मानतो. जय श्रीराम, भारत माता की जय या घोषणा देऊन काय होणार आहे? ज्या लोकांनी कर्ज काढलं आहे ते जर त्यांना फेडता आलं नाही तर त्यांची संपत्ती जप्त केली जाईल. त्यांच्या मालमत्तेचा लिलाव केला जाईल. या सगळ्याचा उपाय जय श्रीराम, भारत माता की जय या घोषणा नाहीत.”
आज पायाभूत सुविधांची गरज जास्त आहे. प्रत्येक व्यक्ती आज महागाईने त्रस्त आहे. अनेक तरुणांना नोकरी नाही, रोजगार नाही, उत्पन्न नाही. या समस्या कशा सुटणार? असाही प्रश्न वरुण गांधींनी विचारला आहे.
उज्ज्वला योजनेविषयी काय म्हणाले वरुण गांधी?
“उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत सात कोटी लोकांना सिलिंडर्स देण्यात आले. सध्या दुसरा सिलिंडर घ्यायची त्यांची ऐपत नाही. कारण सिलिंडर आता ११०० रुपयांचा झाला आहे. सामान्य माणसाने कसं जगायचं? “
सध्या सरकारी विभागांमध्ये एक कोटी पदं रिकामी आहेत. मी सांगत असलेली संख्या नाही तर सरकारने दिलेली संख्या आहे. जर एक कोटी पदं रिकामी आहेत तर ती भरली का जात नाहीत? तुम्हाला (मोदी सरकार) पैसे वाचवायचे आहेत का? जे लोक त्यांच्या परिस्थितीतून उभे राहू शकत नाहीत त्यांना आधार देणं सरकारचं काम आहे. १ कोटी पदं भरली गेली तर किती लोकांना संधी मिळेल तुम्हीच विचार करा. मात्र हे सरकार विचार करताना दिसत नाही असंही वरुण गांधी म्हणाले.
भाजपा खासदार वरुण गांधी म्हणाले मागच्या सात वर्षात महागाई प्रचंड वाढली आहे. केरोसीनच्या किंमती अडीचशे पटींनी वाढल्या आहेत. दुधाच्या किंमती ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. कांद्यांच्या किंमती ७० टक्के वाढल्या आहेत असंही वरुण गांधी यांनी म्हटलं आहे.