पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताचे पंतप्रधानपद सहजपणे मिळाले, असे अनेकांना वाटते. मात्र, त्यापूर्वी नेहरूंनी केलेला त्याग आणि त्यांनी खाल्लेल्या खस्तांकडे दुर्लक्ष केले जाते, असे भाजप नेते वरूण गांधी यांनी म्हटले. ते शुक्रवारी लखनऊ येथील युवा संमेलनात बोलत होते. यावेळी वरूण गांधी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. या माध्यमातून वरूण गांधी यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केल्याचे बोलले जात आहे. उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वरूण गांधींची ही नाराजी चर्चेचा विषय ठरत आहे. पंडित नेहरूंना सहजपणे भारताचे पंतप्रधानपद मिळाले, त्यांची जीवनशैली ऐषोआरामी आणि राजासारखी होती, असे अनेकजण म्हणतात. मात्र, त्यांनी तब्बल साडेपंधरा वर्षे तुरूंगात काढली, याचा लोकांना विसर पडतो, असे सांगत वरूण गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. मला आज जर कुणी सांगितले की, पंधरा वर्षे तुरूंगात राहा आणि त्यानंतर तुला पंतप्रधानपद देतो, तर मी तो प्रस्ताव मान्य करणार नाही. साडेपंधरा वर्षांच्या काळात माणसाच्या जीवनात खूप मोठा फरक पडतो, त्याचा जीवही जाऊ शकतो, असे वरूण गांधी यांनी म्हटले. नेहरूंनी इतक्या वर्षांच्या त्याग आणि तपस्येनंतर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मदत केली. त्यासाठी त्यांना स्वत:ला आणि त्यांच्या कुटुंबाला खस्ता खाव्या लागल्या याबद्दल आजच्या तरूण पिढीला कळावे, यासाठी आपण हे सगळे सांगत असल्याचे वरूण गांधी यांनी म्हटले. मात्र, या विधानाचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे. आयुष्यात वेगाने पुढे जायचे असेल तर एकटे जा, पण दूरवर जायचे असेल तर सर्वांना सोबत घेऊन जा, हे नेल्सन मंडेला यांचे वचन भाषणादरम्यान उधृत करत वरूण गांधींनी मोदींच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Story img Loader