भाजपाचे पीलीभीत खासदार वरुण गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे ऊसाचे दर वाढवून प्रति क्विंटल ४०० रुपये करण्याचं आवाहन केलं आहे. याआधी १२ सप्टेंबर रोजी देखील वरुण गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून उसाच्या किंमतीत वाढ करण्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर, उसाच्या दरात २५ रुपये प्रति क्विंटल वाढ केल्याबद्दल खासदारांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. तर दुसरीकडे काहीच दिवसांपूर्वी वरुण गांधी यांना काळे झेंडे दाखवल्याबद्दल ३६ शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेश सरकारने रविवारी केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकऱ्यांच्या बाजूने राबवलेल्या योजनांवर चर्चा करताना उसाच्या दरात २५ रुपये प्रति क्विंटल वाढ करण्याची घोषणा केली आहे. सोमवारी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात वरुण गांधी म्हणाले की, “तुमच्या सरकारने उत्तर प्रदेशातील आगामी ऊस गळीत हंगाम २०२१-२२ साठी ऊस दरात २५ रुपये प्रति क्विंटल वाढ केली आहे. या वाढीसाठी तुमचे आभार. मी विनंती करू इच्छितो की, ऊस उत्पादक शेतकरी तुमच्याकडून अधिक भाववाढीची अपेक्षा करत आहेत.”
साखरेच्या दरात २५ रुपये प्रति क्विंटल वाढ केल्याबद्दल वरुण गांधींनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. त्याचसोबत त्यांनी असंही सुचवलं आहे की, काही कारणास्तव जर किंमत वाढवणं शक्य नसेल तर उत्तर प्रदेश सरकारने घोषित केलेल्या ऊस दरात प्रति क्विंटल ५० रुपये बोनस देण्याचा विचार देखील करता येऊ शकतो.
उसाचे भाव वाढवण्याची विनंती
वरुण गांधी यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे की, ऊस हे उत्तर प्रदेशातील एक प्रमुख पीक आहे. ज्यामध्ये सुमारे ५० लाख शेतकरी कुटुंब लागवडीमध्ये गुंतलेली आहेत. लाखो मजुरांनाही यातून रोजगार मिळतो. माझ्या क्षेत्रातील ऊस उत्पादकांनी माझ्याद्वारे विनंती केली आहे की, तुम्हाला कळवा की गेल्या चार वर्षात ऊस, खतं, बियाणं, कीटकनाशकं, वीज, पाणी, डिझेल मजूर, वाहतूक इत्यादींचा खर्च खूपच वाढला आहे. पण त्यात किंमतीमध्ये काहीशी वाढ होती. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आणि मजुरांच्या हितासाठी उसाचे भाव वाढवण्याची वरुण गांधी यांनी आशा व्यक्त केली होती.
काळे झेंडे दाखवल्या प्रकरणी ३६ शेतकऱ्यांविरोधात FIR
भाजपा खासदार वरुण गांधी यांना काळे झेंडे दाखवल्या प्रकरणी शुक्रवारी (२४ सप्टेंबर) उत्तर प्रदेश पोलिसांनी ३६ शेतकऱ्यांविरोधात एफआयआर नोंदवला गेला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या शेतकऱ्यांवर करोना प्रोटोकॉलचं उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात मास्क न घालणं आणि सामाजिक अंतर न पाळणं या गोष्टींचा समावेश होता.