संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमधील भ्रष्टाचाराचे धिंडवडे काढून केंद्रात सत्ता स्थापणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची दररोज नवनवी प्रकरणे समोर येत आहेत. काँग्रेस नेत्यांच्या माऱ्यापुढे भाजप नामोहरम झाला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील कथित गैरव्यवहारातील पळपुटे आरोपी ललित मोदी यांना मदत करण्यासाठी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी थेट धोरणच बदलल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी केला आहे. ललित मोदी यांच्या मालकीच्या ‘गॉडफ्रे फिलिप्स’ या सिगारेट बनविण्याऱ्या कंपनीला लाभ मिळवून देण्यासाठी वसुंधरा राजे यांनी तंबाखूजन्य उत्पादनांवरील करात ३० टक्के कपात केल्याचा गंभीर आरोप जयराम रमेश यांनी केला. गतवर्षी याच उत्पादनांवर ६० टक्के कर लावल्याने जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने राज्य सरकारला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मग अशी कोणती परिस्थिती ओढवली व सरकारने करात कपात केली, असा प्रश्न जयराम रमेश यांनी विचारला.ते म्हणाले की, ललित मोदी यांच्या मालकीची गॉडफ्रे फिलिप्स ही सिगारेट बनवणारी कंपनी आहे. या कंपनीला लाभ मिळवून देण्यासाठी वसुंधरा राजे यांनी लोकांच्या आरोग्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. सिगरेटवरील कर त्यांनी ६० वरून थेट ३० टक्के केला. यामुळे राज्य सरकारचे ३६० कोटी रुपयांचे नुकसान झाले. एवढेच नव्हे तर तंबाखूच्या सेवनाने होणाऱ्या कॅन्सरग्रस्तांची संख्या वाढून त्यांच्या उपचारासाठी सरकाला अतिरिक्त १ हजार १६० कोटी रुपयांची तरतूद करावी लागली. ललित मोदींसारख्या पळपुटय़ा आरोपी मित्राची मदत करण्यात राजे यांनी कोणतीही कसर ठेवली नाही. त्यांनी त्यासाठी लोकांचे आरोग्य पणाला लावले. रमेश यांच्या आरोपामुळे भाजपचे धाबे दणाणले आहेत. राजस्थान सरकारकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप प्रवक्त्यांना मौन बाळगण्याचे आदेश दिले. ललित मोदी यांच्या पत्नीवर उपचार करण्यात आलेल्या पोर्तुगालच्या रुग्णालयास राजस्थानमध्ये जागा तसेच वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया न करता थेट अधिकार दिले. ललित मोदी यांच्याशी संबंधित सर्व कंपन्यांना अशी खास वागणूक का, असा प्रश्न रमेश यांनी विचारला. ‘खोटे वचन व खोटे आश्वासन’ देणारे भाजप नेते खोटय़ाची पाठराखण करीत आहेत, असे रमेश म्हणाले.
शाब्दिक चकमक
ललित प्रकरणावरून जयपूरमध्ये माध्यमांचे प्रतिनिधी आणि भाजपचे नेते यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. परनामी यांच्याकडे दस्तऐवजाच्या प्रतींची मागणी केली असता त्यांनी या प्रती माहितीच्या अधिकारांत मिळवून खातरजमा करण्याची सूचना माध्यमांच्या प्रतिनिधींना केली. ढोलपूर महालावरून काँग्रेसचे नेते संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.