आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना मदत केल्याने अडचणीत सापडलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावर काँग्रेसने सोमवारी आणखी एक गंभीर आरोप केल्याने खळबळ माजली आहे. ललित मोदी यांच्याशी संगनमत करून वसुंधरा राजे यांनी राजस्थान सरकारची मालमत्ता असलेला ढोलपूरचा महाल हडप केल्याचा जळजळीत आरोप काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
सदर महाल हडप करून त्याचे रूपांतर एका आलिशान हॉटेलमध्ये करण्यात आले असल्याचा आरोप रमेश यानी केला आणि त्याच्या पुष्टय़र्थ काही दस्तऐवज पुरावे म्हणून सादर केले. ढोलपूर संस्थान १९५४ मध्ये स्वतंत्र भारतात विलीन करण्यात आले. त्यानंतर १९७७ मध्ये सदर महाल ही सरकारी मालमत्ता असल्याचे जाहीर करण्यात आले आणि २०१० मध्येही तीच स्थिती होती, असे रमेश म्हणाले. वसुंधरा राजे यांचे पती हेमंतसिंह यांनी, सदर महाल राजस्थान सरकारची मालमत्ता असल्याचे न्यायालयासमोर कबूल केल्याचे रमेश म्हणाले.
मात्र २०१३ मध्ये निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात वसुंधरा राजे यांनी सदर महाल म्हणजे हॉटेल असल्याचे दर्शविले. वसुंधरा राजे आणि ललित मोदी यांनी राज्य सरकारच्या कोणत्याही सहभागाविना त्यामध्ये १०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
नियंत हॉटेल हेरिटेज प्रा. लि. मध्ये वसुंधरा राजे यांचे ३२८०, त्यांचे पुत्र दुष्यंतराजे यांचे  आणि सून निहारिका यांचे प्रत्येकी ३२२५इतके समभाग आहेत. इतकेच नव्हे तर ललित मोदी यांची आनंद हेरिटेज हॉटेल्स प्रा. लि.चे ८२५ समभाग आहेत, असे जयराम रमेश म्हणाले.
ललित मोदी आणि वसुंधरा राजे यांची कंपनी कोणतेही हॉटेल उभारत नाहीत, राजस्थानातील कंपनीवर केवळ कब्जा करते. मोदी आणि वसुंधरा राजे यांचे व्यावसायिक संबंध आहेत, असेही रमेश म्हणाले.
या वेळी रमेश यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीका केली. पंतप्रधानांना ‘मौनेंद्र बाबा’ असे त्यांनी संबोधले. वसुंधरा राजे यांच्या घोटाळ्याबाबत मोदी काहीच भाष्य करीत नाहीत, असे जयराम रमेश म्हणाले.