राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा वसुंधरा राजे सिंधिया यांनी उदयपूरमधील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याची राजस्थानसह देशाच्या राजकारणात बरीच चर्चा होत आहे. सुंदर सिंह भंडारी चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेला जनसन्मान सोहळा आणि व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाला वसुंधरा राजे यांनी देखील संबोधित केलं. वसुंधरा राजे म्हणाल्या, “सुंदर सिंह भंडारी यांनी एकेक माणसाला निवडून भाजपात आणलं आहे. त्यांनी या भागात एका छोट्याशा रोपट्याचं मोठ्या वृक्षात रुपांतर केलं आहे. या भागात आपली संघटना मजबूत केली, कार्यकर्त्यांना मोठं केलं. पक्ष, संघटना मोठी करत असताना त्यांच्यामुळे कार्यकर्तेही मोठे झाले. त्यांनी राजस्थानमध्ये भैरेसिंह शेखावत यांच्यासह इतर अनेक नेत्यांना पुढे आणलं. परंतु, निष्ठेचा तो काळ वेगळा होता, त्याकाळी कोणी काय केलंय यावर लोकांचा विश्वास असायचा. हल्लीचे लोक जे बोट धरून मोठे झाले, चालायला शिकले, तेच बोट कापण्याचा प्रयत्न करतात.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसुंधरा राजे यांच्या या वक्तव्याचा लोक आपापल्या परिने राजकीय अर्थ शोधण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे याबाबत लोक तर्कवितर्क लावत आहेत. अलीकडच्या काळात वसुंधरा राजे आणि भाजपाच्या दिल्लीमधील नेतृत्वामधला संघर्ष वाढला आहे. राजस्थानची विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीच्या काळात हा संघर्ष टोकाला पोहोचला होता. दरम्यान, वसुंधरा राजे त्यांच्या मनातली खदखद व्यक्त करू लागल्या आहेत.

या कार्यक्रमाला आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया उपस्थित होते. यावेळी राजे यांनी कटारिया यांचंही कौतुक केलं. त्या म्हणाल्या, “गुलाबचंद कटारिया यांनी देखील लोकांना भाजपाबरोबर जोडण्याचं काम केलं. ते आजही संघटनेसाठी काम करत आहेत. ते आता आसामचे राज्यपाल आहेत. दूर असले तरी ते आमच्याबरोबर आहेत. ते आम्हा सर्वांची काळजी घेतात.”

हे ही वाचा >> “…तेव्हा आपल्याच घरभेद्यांनी घर फोडलं”, गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना टोला? म्हणाले, “यंदा जळगावात…”

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपादरम्यान वसुंधरा राजे आणि गुलाबचंद कटारिया यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाल्याचं वृत्त माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. तसेच निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेच्या वेळी पक्षश्रेष्ठींनी वसंधुरा राजेंकडे सपशेल दुर्लक्ष केलं. वसुंधरा राजे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असं बोललं जात होतं. मात्र पक्षाने भजनलाल शर्मा यांना राज्याच्या प्रमुख पदावर बसवलं. या सगळ्या घडामोडींमुळे भाजपा पक्षनेतृत्व आणि वसुंधरा राजेंमध्ये संघर्ष सुरू झाल्याचं बोललं जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasundhara raje scindia says there is no loyalty in politics now asc