महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे सुरू झालेलं सत्तानाट्य अजूनही संपलेलं नसताना आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यासह राष्ट्रीय पातळीवर दुसरं सत्तानाट्य रंगू लागलं आहे. भाजपानं द्रौपदी मुर्मू यांचं नाव राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील उमेदवार म्हणून जाहीर केल्यानंतर त्यांच्यासमोर बिगर भाजपा पक्षांनी यशवंत सिन्हा यांना उमेदवार म्हणून पाठिंबा दिला आहे. संख्याबळाच्या द़ृष्टीने भाजपाकडे सध्या बहुमत दिसत असलं, तरी विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या कलगीतुऱ्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला खडे बोल सुनावले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

द्रौपदी मुर्मू यांना भाजपाची उमेदवारी

द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यावरून राज्यात सुरू असलेले तर्क-वितर्क उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर थंडावले आहेत. शिवसेना मुर्मू यांनाच निवडणुकीत पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत आघाडीत असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. मात्र, स्वतंत्र निर्णय घेण्याचं शिवसेनेचं स्वातंत्र्य मान्य करत काँग्रेस-राष्ट्रवादीनं या विषयावर पडदा टाकला आहे. मात्र, विरोधकांचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडण्यात चूक झाल्याची टीका टीव्ही ९ शी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

“राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी माझ्याकडे एकही मत नाही. पण सध्या काँग्रेस पक्षाकडून दिवाळखोरीचं राजकारण सुरू आहे. त्यांना विचार नाही. हा पक्ष अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यासमोर पूर्णपणे शरण गेला आहे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

“आदिवासी वर्गातलाच उमेदवार हवा होता”

दरम्यान, यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी आपण आदिवासी वर्गातलाच उमेदवार असायला हवा असं म्हणालो असल्याचं नमूद केलं. ” याआधीही मी म्हणालो होतो की राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडत असताना तो आदिवासी वर्गातला असला पाहिजे. माझी ही भूमिका मी विरोधी पक्षाला कळवली होती. एकीकडे हे स्वत:ला विचारांचे ठेकेदार समजतात. पण दुर्दैवाने ते अक्कलशून्य आहेत”, असं आंबेडकर म्हणाले.

मुर्मू यांना शिवसेनेनं दिलेल्या पाठिंब्यामुळे आघाडीत बिघाडी?; उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर काँग्रेस म्हणते, “आम्हाला ठाऊक नाही की…”

“आज भाजपानं एक आदिवासी उमेदवार दिला, पण आपल्याला देता आला नाही हे मोठ्या मनाने मान्य करणं ही दानत ज्यांच्याकडे नाही. त्यांनी इतरांवर टीका करू नये”, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला खोचक सल्ला दिला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vba chief prakash ambedkar slams congress on presidential election yashwant sinha pmw
Show comments