मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी राज्यातील अंगणवाडय़ांमध्ये अंडी वाटपाच्या प्रस्तावाला नकार दिला आहे. स्वत: शाकाहाराचे पुरस्कर्ते असलेल्या चौहान यांच्या मते मानवी शरीर हे शाकाहारासाठी विकसित झाले असून त्यात मानवाला आवश्यक सर्व पोषक तत्वे मिळतात. त्यामुळे अंगणवाडीतील विद्याथ्यांना अंडी वाटण्याची गरज नाही. त्याऐवजी अंगणवाडीत मुलांना आणि गर्भवती महिलांना दूध आणि फळे दिली जावीत, असे त्यांनी म्हटले.
राज्यातील अंगणवाडय़ांमध्ये दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात अंडय़ांचा समावेश करावा. अंडय़ांच्या पोषक गुणधर्मामुळे बहुतांशी ग्रामीण व आदिवासी भागातील मुलांच्या कुपोषणावर मात करण्यास मदत होईल, असा प्रस्ताव काही अधिकाऱ्यांनी मांडला होता. गेल्या एप्रिल महिन्यात राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याचे प्रधान सचिव जे. एन. कनसोटिया यांनी अलीराजपूर, मंडला आणि होशंगाबाद जिल्ह्य़ांच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत प्रस्ताव मागितला होता. पण त्याला राज्यातील जैन समाजाने आक्षेप घेतला. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत जा प्रस्ताव धुडकावून लावला. आपण मुख्यमंत्री असेपर्यंत राज्यातील अंगणवाडय़ांमध्ये अंडीवाटप केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र राइट टू फूड चळवळीशी संबंधित कार्यकर्ते सचिन जैन यांच्या मते ज्यांचा अंगणवाडी पोषण आहाराशी काहीही संबंध नाही अशा सधन समुदायाने त्यावर आक्षेप घेतला म्हणून हा प्रस्ताव नाकारणे योग्य नाही.