शाकाहार चांगला की मांसाहार हा फार जुना वाद आहे, पण संशोधकांनी अलीकडेच त्याचे उत्तर दिले आहे. त्यांच्या मते शाकाहारी व्यक्ती या मांसाहारी व्यक्तींपेक्षा जास्त काळ जगतात म्हणजेच त्या दीर्घायुषी असतात. नवीन अभ्यासानुसार विशेषत: पुरूषांमध्ये शाकाहारी व्यक्तींचे आयुर्मान हे मांसाहारी पुरूषांपेक्षा जास्त असते. कॅलिफोर्नियातील लोमा लिंडा विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनात असे दिसून आले की, शाकाहारी पुरूष हे सरासरी ८३.३ वर्षे जगले तर महिला ८५.७ वर्षे जगल्या. मूळ कॅलिफोर्नियन व्यक्तींपेक्षा त्यांचे आयुर्मान अनुक्रमे ९.५ वर्षे तर ६.१ वर्षे अधिक आहे.
‘हफिंग्टन पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार ७० ते ८० च्या दशकातील अभ्यासात १९५८ पासून शाकाहारी असलेल्या हजारो व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला होता. त्यात शाकाहारी व्यक्ती या मांसाहारी व्यक्तींपेक्षा जास्त काळ जगतात असे दिसून आले होते. ‘अ‍ॅकॅडमी ऑफ न्यूट्रिशन अँड डायटेक्टिस -२०१२’ या परिषदेत एक संशोधन अहवाल सादर करण्यात आला असून त्यात अमेरिका व कॅनडा या देशातील ९६ हजार लोकांचा अभ्यास करण्यात आला आहे.
मुख्य संशोधक गॅरी इ. फ्रेजर यांनी असे सांगितले की, शाकाहारी व्यक्ती या मांसाहारी व्यक्तींपेक्षा वजनाने सरासरी १३ किलोने कमी असतात. त्यांचा बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) पाच अंकानी कमी असतो. शाकाहारी हे मांसाहारींपेक्षा इन्शुलिनला कमी रोधक असतात. शाकाहारी व्यक्तींची व्यायाम करण्याची, वनस्पतिजन्य अन्न खाण्याची व सिगरेट टाळण्याची शक्यताही जास्त असते. शाकाहारी व्यक्तींचे आरोग्य तुलनेने जास्त चांगले राहण्याची अनेक कारणे आहेत. अंशत: शाकाहारी व अर्धशाकाहारी लोक प्राणिजन्य पदार्थ कमी प्रमाणात खातात पण तरीही ते आठवडय़ातून एकदा मांस-मटण खातात, त्यांना जीवनशैलीचे आजार कमी असतात असा दावा फ्रेझर यांनी केला आहे. आफ्रिका व अमेरिकेतील एकूण २५ टक्के लोकांचा अभ्यास यात करण्यात आला असून लठ्ठपणामुळे या लोकांचे आयुर्मान हे ६.२ टक्क्य़ांनी कमी होते.

Vegitreian

Story img Loader