पीटीआय, प्रयागराज
महाकुंभाच्या निमित्ताने प्रयागराजमध्ये होणारी गर्दी पाहून प्रशासनाने मंगळवारी, माघी पौर्णिमेच्या आदल्या दिवसापासून शहरामध्ये नव्याने येणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. महाकुंभातील तिसरे अमृत स्नान बुधवारी माघी पौर्णिमेच्या मुहूर्तावर होत आहे. त्यानंतर कल्पवास कालावधी समाप्त होईल. भाविकांची वाढती गर्दी, गेल्या काही दिवसांमधील वाहतुकीची कोंडी, लोकांची गैरसोय या बाबी विचारात घेऊन प्रशासनाने वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.
महाकुंभाची जागा वाहनमुक्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवांना या नियमातून वगळण्यात आल्याचे सरकारी निवेदनात नमूद करण्यात आले. यापूर्वी २९ जानेवारीच्या मौनी अमावस्येच्या अमृत स्नानाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ३० जणांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर, भाविकांची सुरक्षा विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आपत्कालीन परिस्थिती उद्भवून भाविकांना महाकुंभ क्षेत्रातून बाहेर काढण्याची वेळ आली तर विशेष वाहतूक योजना आखण्यात आली आहे. दरम्यान, कुंभमेळ्यात आतापर्यंत ४५ कोटींपेक्षा जास्त भाविकांनी संगम स्नान केल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी दिली.