लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्याच्या घटनेवर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतलाय. काँग्रेसने केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या हकालपट्टीची मागणी करत लखीमपूर खेरीला गाड्यांचा मार्च काढलाय. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू हजारो गाड्यांसह लखीमपूरकडे रवाना झालेत. याशिवाय राजस्थानमधूनही शेकडो गाड्या उत्तर प्रदेश सीमेकडे रवाना झाल्यात. त्यामुळे लखीमपूर हिंसाचाराचा मुद्दा ऐरणीवर येऊन उत्तर प्रदेशमधील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले, “जर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला अटक केली नाही, तर उद्यापासून मी उपोषणाला बसेल.” काँग्रसेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करत या गाडी मार्चची माहिती दिलीय. या ट्विटमध्ये म्हटलं आहे, “लखीमपूर खेरी हिंसाचाराविरोधात आणि शहीद शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नेतृत्वात आमदार, नेते आणि कार्यकर्ते लखीमपूरकडे रवाना झाले आहेत. काँग्रेस न्यायाच्या लढाईत शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत आहे.” विशेष म्हणजे या ट्विटमध्ये काँग्रेसने #SackAjayMishra असा हॅशटॅगही वापरलाय.
काँग्रेस नेते हरिश रावत यांनी देखील लखीमपूर घटनेवर प्रतिक्रिया दिलीय. “देशातील लोकशाही धोक्यात आहे. सहिष्णु भारत असहिष्णु होत आहे. लखीमपूर खेरीची घटना याचंच उदाहरण आहे. उत्तराखंड काँग्रेसने शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लखीमपूर चलोचं आवाहन केलंय.”
हेही वाचा : “लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारलं”, मविआची महाराष्ट्रात राज्यव्यापी बंदची हाक
राजस्थान काँग्रेसच्या शेकडो गाड्या लखीमपूरकडे रवाना
एकूणच काँग्रेसने विविध राज्यातील नेते आणि कार्यकर्ते लखीमपूर खेरीकडे रवाना होत आहेत. काँग्रेसने राजस्थानमधील मार्चची माहिती देताना सांगितलं, “लखीमपूर खेरी हिंसाचाराविरोधात आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह गोतसरा यांच्या नेतृत्वात शेकडो गाड्यांचा ताफा उत्तर प्रदेश सीमेकडे रवाना झालाय. काँग्रेस शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या लढाईत त्यांच्या नातेवाईकांसोबत असेल.”