आपल्या समाजवादी विचारसरणीमुळे गरिबांचे हिरो बनलेले व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेज यांचे कर्करोगामुळे मंगळवारी निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. गेल्या दोन वर्षांपासून चावेज कर्करोगाशी लढा देत होते. अखेर मंगळवारी त्यांचा लढा अपयशी ठरला आणि त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले.
गेल्या १४ वर्षांपासून चावेज व्हेनेझुएलाचे अध्यक्ष होते. २०११ मध्ये पहिल्यांदा त्यांना ओटीपोटाचा कर्करोग असल्याचे निदान करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर क्युबामध्ये चारवेळा शस्त्रक्रिया करण्यात आली. डिसेंबर २०११ मध्ये शेवटची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर चावेज कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. स्थानिक वेळेनुसार दुपारी ४.२५ (रात्री ८.५५ जीएमटी) चावेज यांची प्राणज्योत मालवल्याचे व्हेनेझुएलाचे उपाध्यक्ष निकोलस मदुरो यांनी वृत्तवाहिनीवर सांगितले.
करिष्मा असेलेला नेता ही चावेज यांची ओळख होती. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये व्हेनेझुएलामध्ये झालेली निवडणूक त्यांच्या पक्षाने सहजपणे जिंकली होती. त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताने व्हेनेझुएलातील त्यांचे लाखो समर्थक हळहळले. अमेरिकेविरोधी त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेही अनेकांनी चावेज यांना डोक्यावर घेतले. गरिबांसाठी अनुदानित अन्नधान्य पुरवठा आणि मोफत आरोग्य सुविधा या त्यांच्या दोन योजनाही विशेष गाजल्या होत्या.

Story img Loader