चहा विक्रेत्यांचा अपमान करणाऱया कॉंग्रेसला आणि त्यांच्या नेत्यांना येत्या निवडणुकीत जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते एम. वेंकय्या नायडू यांनी बुधवारी विजयवाडा येथे दिला. नायडू यांनी एका चहाच्या गाडीचे उदघाटन करून आंध्र प्रदेशमधील पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी पहिल्यांदाच त्यांनी चहाची चवही चाखली.
कार्यक्रमात नायडू यांनी कॉंग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, चहा विक्रेत्यांचा अपमान करणाऱया मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याबद्दल कॉंग्रेसने माफी मागितलेली नाही. स्वयंरोजगार करणाऱया आणि इतरांनाही रोजगार मिळवून देणाऱया हजारो चहा विक्रेत्यांचा अय्यर यांनी आपल्या वक्तव्यातून अपमान केला आहे. आता येत्या निवडणुकीत जनताच अय्यर यांच्यासारख्या उद्धट नेत्यांना आणि कॉंग्रेसला त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.
गेल्या ५५ वर्षांच्या कारभारात कॉंग्रेसमधील अनेक नेते भ्रष्टाचाराच्या वेगवेगळ्या प्रकरणात अडकले. मात्र, या काळात विकासाची फळे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलीच नाही. गरीब आणखी गरीब झाले तर श्रीमंतांची संपत्ती वाढतच गेली. यामध्ये बदल झाला पाहिजे, असेही नायडू म्हणाले.

Story img Loader