लेखक, साहित्यिकांच्या पुरस्कारवापसीवर भारतीय जनता पक्षाने कडाडून हल्ला चढविला आहे. कथित असहिष्णुतेच्या बाता मागणारा काँग्रेस व त्यांचे सहकारी पक्ष आणीबाणीच्या काळात व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होत असताना मूग गिळून का गप्प बसले होते, असा खणखणीत प्रश्न शहरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी विचारला. पत्रकार परिषदेत नायडू यांनी काँग्रेसने कथित असहिष्णुतेविरोधात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना भेटणे म्हणजे सर्वात मोठा विनोद असल्याची टीका त्यांनी केली. हा प्रकार सैतानाने धर्मग्रंथ वाचल्यासारखा आहे, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसला सुनावले.
गेल्या काही दिवसांपासून देशात धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या घटना वाढल्या असल्याचा आरोप काँग्रेस नेते करीत आहेत. त्यास गेल्या दोन दिवसांपासून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तमाम भाजप नेते अत्यंत आक्रमक शब्दात प्रत्युत्तर देत आहेत. नायडू म्हणाले का, आणीबाणीदरम्यान सामान्य नागरिकांवर अन्याय झाले. लोकप्रतिनिधींना तुरुंगात टाकण्यात आले. १९८४ साली शीख दंगली झाल्या. काही नेत्यांच्या देखरेखीखाली या दंगली घडविल्या गेल्या. काँग्रेसच्या नेत्यांनी ‘मोठा वृक्ष उन्मळून पडताना धरणीकंप होतो’ अशा शब्दात या दंगलीचे समर्थन केले होते. तेव्हा काँग्रेस व त्यांच्या सहकाऱ्यांनी असहिष्णुतेविरोधात आवाज का उठविला नाही. दादरी प्रकरण, कलबुर्गी व नरेंद्र दाभोलकर यांचे हत्या प्रकरण काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षाच्या राज्यात घडल्याची आठवण नायडू यांनी करून दिली. नायडूंच्या निशाण्यावर काँग्रेस, समाजवादी पक्षासह डावे पक्षदेखील होते. केरळमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. त्यापूर्वी डाव्यांच्या राजवटीत झालेली ख्रिश्चन धर्मप्रसारक टीजे जोसफ यांच्या निर्घृण हत्येस कोण जबाबदार होते, याचा जाब काँग्रेसने का विचारला नाही? २०१० मध्ये हरयाणातील काँग्रेस राजवटीत एका सत्तर वर्षीय वृद्धास त्याच्या अपंग मुलीसमवेत जिवंत जाळण्यात आले. काँग्रेसच्या काळात हरयाणातील दलित इतके असुरक्षित होते की, त्यांना दिल्लीत आसरा घ्यावा लागला. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने हरयाणा सरकारला सुनावले व दलितांना योग्य न्याय देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे आदेश दिले होते. तेव्हा काँग्रेसला असहिष्णुतेची आठवण आली नाही का? स्वातंत्र्यानंतर एक राजकीय पक्ष व एकाच कुटुंबाचे गुणगान करण्यात आले. विकासाच्या मुद्दय़ावर पहिल्यांदा बिगरकाँग्रेसी सरकार सत्तेवर आले. हेच खरे दुखणे आहे. त्यामुळे काही जण आपापले सरकारी पुरस्कार परत करीत असल्याची टीका नायडू यांनी नयनतारा सहगल, डॉ. आनंद पटवर्धन यांच्यावर केली.
मोदी केवळ विकासाची भाषा करीत आहेत. लोकांना विकास हवा आहे. देशाची प्रतिमा मलिन करण्यासाठी काँग्रेसच्या पाठबळावर काही जण संघटित झाले आहेत. मात्र लोक त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत, असा विश्वास नायडू यांनी व्यक्त केला.

स्वातंत्र्यानंतर एक राजकीय पक्ष व एकाच कुटुंबाचे गुणगान करण्यात आले. त्याशिवाय अन्य कोणताही विचार वाढू देण्यात आला नाही.
– व्यंकय्या नायडू