आजवर अनेक सरकारांची कत्तल केलेल्यांनी आमच्यावर हत्येचा आरोप करू नये, असे सांगत केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी काँग्रेसवर जोरदार प्रतिहल्ला चढवला. उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने मोदी सरकार लोकशाहीची हत्या करत असल्याचे म्हटले होते. काँग्रेसने ३५६ कलमाचा आधार घेत केरळमध्ये पहिल्यांदाच लोकशाही पद्धतीने निवडून आलेले ईएमएस नंबुद्रीपाद यांच्या सरकारपासून आत्तापर्यंत शंभरहून अधिक बिगरकाँग्रेसी सत्ता बरखास्त केल्या आहेत. त्याच काँग्रेस पक्षाने आता भाजपवर टीका करणे, हास्यास्पद असल्याचे नायडूंनी यावेळी म्हटले. यावेळी नायडूंनी उत्तराखंडच्या मुद्द्यावरून काँग्रेसला साथ देणाऱ्या डाव्या पक्षांनाही लक्ष्य केले. केरळमध्ये १९५९ साली ईएमएस नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्त्वाखाली निवडून आलेले डाव्यांचे सरकार काँग्रेसने बरखास्त केले होते, याची आठवण नायडूंनी डाव्या पक्षांना करून दिली.

Story img Loader