आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात महत्त्वपूर्ण विधेयकांचा मार्ग सुकर व्हावा, या उद्देशाने गुरूवारी संसदीय कामकाज मंत्री वैंकय्या नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेतली. नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून विरोधकांनी सभागृहात घातलेल्या गोंधळामुळे हिवाळी अधिवेशानात फारसे कामकाज होऊ शकले नव्हते. विरोधकांच्या या असहकारामुळे वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी), रिअल इस्टेट यांसारखी महत्त्वपूर्ण विधेयकांचे गाडे अडून आहे. विशेषत: राज्यसभेत बहुमताअभावी विधेयके मंजूर करवून घेताना सरकारला मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर निदान आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी महत्त्वपूर्ण विधेयके मंजूर करून घेण्यासाठी काँग्रेसचे सहकार्य लाभावे, यासाठी नायडूंनी सोनिया गांधींची भेट घेतली. सर्वपक्षीय सहमती असल्यास अधिवेशन नियोजित वेळेपेक्षा लवकर बोलविण्यास सरकारची तयारी असल्याचेही नायडू यांनी सोनिया गांधींना सांगितले.

Story img Loader