गरीब लोकांना निश्चलीकरण यशस्वी व्हावे असे वाटते. गरिबांना मोदींमध्ये देवदूत दिसतो, असे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. देशातील गरिब लोक मोदींचा निर्णय यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र विरोधक सरकारवर टीका करत आहेत, असे म्हणत नायडूंनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी परदेशातील काळा पैसा परत आणण्याचा प्रयत्न केला. आता ते देशातील काळा पैसा बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाने कॅशलेस अर्थव्यवस्था असावी, हे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. लवकरच मोदींकडून जेएएम (जनधन, आधार, मोबाईल) साठी पुढाकार घेणार आहेत,’ असे नायडू यांनी म्हटले.

निश्चलीकरणाचा निर्णय मागे घेण्यात येणार नाही, ही बाबदेखील नायडूंनी पुन्हा एक स्पष्ट केली. ‘निर्णय मागे घेणे मोदींच्या रक्तात नाही. त्यामुळे निश्चलीकरणाचा निर्णय मागे घेतला जाणार नाही,’ असे नायडूंनी स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडूंनी विरोधकांनादेखील लक्ष्य केले आहे. ‘विरोधक संसदेत गोंधळ घालत आहेत. विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेत चर्चा होऊ शकत नाही आहे. संसदेत गदारोळ करुन कामकाज होऊ न देणारे विरोधक या प्रकरणी सरकारला जबाबदार धरत आहेत,’ अशी टीका नायडूंनी केली आहे. ‘विरोधकांचे एकी आश्चर्यकारक आहे. मात्र एकत्र येऊनही त्यांचे सामर्थ्य किती आहे ?,’ असा प्रश्न नायडूंनी उपस्थित केला आहे.

याआधीही मार्च महिन्यात व्यंकय्या नायडूंनी पंतप्रधान मोदींचे तोंडभरुन कौतुक केले होते. ‘पंतप्रधान मोदी देवाने दिलेले वरदान आहेत. मोदी गरिबांचे देवदूत आहेत. आज जगभरात मोदींमुळेच भारताची ओळख आहे. जगभरात मोदींमुळेच भारताचा सन्मान केला जातो,’ अशा शब्दांमध्ये नायडूंनी भाजपाच्या कार्यकारणीच्या बैठकीत मोदींवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला होता. ‘पंतप्रधान मोदींना प्रत्येक क्षेत्रात आव्हाने ही वारश्यानेच मिळाली आहेत. ते प्रत्येक क्षेत्रातील आव्हानांना समर्थपणे तोंड देत आहेत. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा प्रमुख म्हणून मोदींकडे पाहिले जाते,’ अशा शब्दांमध्ये नायडूंनी मोदींचे तोंडभरुन कौतुक केले होते.

[jwplayer KmEBhKz4]

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबरला निश्चलनीकरणाच्या निर्णयाची घोषणा केली. मोदींच्या या निर्णयामुळे पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून रद्द झाल्या. मोदींच्या या घोषणेनंतर दुसऱ्या दिवशी देशभरातील बँका आणि एटीएम बंद होती. यानंतर १० नोव्हेंबरपासून देशभरातील बँकांमध्ये जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी लोकांच्या रांगाच रांगा पाहायला मिळाल्या. सध्या नोटाबंदीच्या निर्णयावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना संसदेत घेरल्याचे दिसत आहे.

[jwplayer AZhpSNNY]

 

Story img Loader