या महिन्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात भूसंपादन विधेयकासह अनेक महत्त्वाची विधेयके मांडली जाणार असून, ती मंजूर करण्यासाठी काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी मदत करावी, असे आवाहन संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केले.
भूसंपादन विधेयक ही काळाची गरज असून आपण गमावलेल्या संधी गाठण्यासाठी काळाशी स्पर्धा करीत आहोत. जग वेगाने पुढे जात असताना भारताला मागे राहून चालणार नाही. संसदेने राजकीय आणि अडवणुकीचा आखाडा ठरण्यापेक्षा विधायक कामांना प्रोत्साहन द्यावे, असे नायडू  म्हणाले.
काँग्रेसशासित राज्यांसह सर्व राज्यांशी, तसेच या मुद्दय़ाशी संबंधित सर्वाशी विस्तृत चर्चा केल्यानंतरच सरकारने भूसंपादन विधेयक आणले आहे. काँग्रेसचे नेते आनंद शर्मा व पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकांच्या सूचनांनुसार विधेयकात दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. तरीही या विधेयकाला काँग्रेस केवळ विरोधासाठी विरोध करत असल्याचा आरोप मंत्र्यांनी केला.
काँग्रेसचे नेते जयराम रमेश या विधेयकाबाबत अपप्रचार करत असल्याचे काही बातम्यांचा संदर्भ देऊन नायडू यांनी सांगितले. दुर्दैवाने काँग्रेस राजकीय कारणासाठी विधेयकाला विरोध करत आहे. त्यांनी विधायक भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
भूसंपादन विधेयकासह जीएसटी विधेयक, स्थावर मालमत्ता विकास व नियमन विधेयक, जाहीर न केलेल्या विदेशातील मिळकती आणि मालमत्तेवर कर लावणारे विधेयक, विभागीय ग्रामीण बँका विधेयक अशी अनेक महत्त्वाची विधेयके येत्या अधिवेशनात मांडण्याचा सरकारचा मानस असल्याचे नायडू म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा