पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी बुधवारी‘परिवर्तन महारॅली’दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर बोचरी टीका केली, तर नितीश यांनी दिल्लीत या टीकेला चोख प्रत्त्युत्तर दिले. या शाब्दीक धुळवडीमुळे सार्वत्रिक निवडणुकीच्या मोर्चेबांधणीलाच जणू सुरुवात झाल्याचे दिसून आले.
नितीशकुमार तर भाजपचे पोपट
नितीशकुमार हे हुकूमशहा असून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे पोपट आहेत. त्यांचा राजकीय क्षितिजावरूनच अस्त होणे अटळ आहे, अशी टीका करीत आपले पुत्र तेजप्रताप यादव आणि तेजस्वी यादव यांना लोकांसमोर आणण्यासाठी प्रामुख्याने लालूप्रसाद यांनी ही रॅली भरवली होती. रॅलीच्या सर्व पोस्टर्सवर या दोघांचे चेहरे ठळकपणे झळकत होते. ४० अंश सेल्सियस इतके प्रखर तापमान असताना गांधी मैदानात भव्य सभा घेऊन लालूप्रसाद यांनी शक्तिप्रदर्शनाची संधी साधली. खास लालू शैलीतले विनोद आणि शेलक्या उपमांसह त्यांनी नितीश कुमार यांच्या प्रतिमाभंजनाचा प्रयत्न केला. नितीश हे निधर्मीपणाचे सोंग वठवत आहेत. खरा निधर्मीवादाचा पुरस्कर्ता मीच आहे. माझ्या शरीरात रक्ताचा अखेरचा थेंब असेपर्यंत दिल्लीत धर्माध पक्षांचे सरकार मी येऊ देणार नाही, असे लालूप्रसाद यादव म्हणाले.
ते तर निव्वळ वाचाळ
लालूप्रसाद यादव हे निव्वळ वाचाळ असल्याचा टोला नितीश कुमार यांनी लगावला आहे.
मंगळवारी लालूप्रसादांनी नितीश कुमार हे संघ आणि भाजपच्या हातातील बाहुले असल्याचे म्हटले होते. त्यावर लालूप्रसाद हे बोलघेवडे असून त्यांच्या टीकेला उत्तर देण्याची इच्छा नाही, असे सांगत नितीश कुमार यांनी पलटवार केला. नवी दिल्लीत राज्याच्या वार्षिक योजनेबाबत नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालीया यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते आले होते.