Tesla in India: अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्ला लवकरच भारतात येणार असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान मस्क यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर भारतात प्रकल्प उभारण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर टेस्लाने भारतात नोकरभरतीही सुरू केली होती. मात्र आता एलॉन मस्क यांचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांना फारसा रुचलेला दिसत नाही. भारतात टेस्लाचा प्रकल्प उभारणे चुकीचे होईल, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. फॉक्स न्यूजचे अँकर शॉन हॅनिटी यांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी एलॉन मस्क यांच्या उपस्थितीत हे विधान केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचा दौरा केला तेव्हाच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने लादलेल्या आयात शुल्कावरून नाराजी व्यक्त केली होती. आता फॉक्स वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, “जगातील प्रत्येक देश आमचा लाभ उचलण्याचा प्रयत्न करतो. ते आमच्या देशातील कंपन्यांच्या उत्पादनांवर शुल्क आकारतात, त्यामुळे या कंपन्यांना व्यापार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. एलॉन मस्क भारतात प्रकल्प थाटणार असतील तर त्यांच्यासाठी हे ठिक असेल. पण अमेरिकेसाठी हे योग्य होणार नाही. अमेरिकेसाठी ते खूप चुकीचे ठरेल.”

मुंबई आणि दिल्लीत टेस्ला शोरूमची तयारी

रॉयटर्सच्या अहवालानुसार, भारतात प्रवेश करत असताना टेस्लाने दोन शहरात रिटेल आऊटलेट सुरू करण्याचा निर्णय घेला आहे. राजधानी दिल्ली आणि मुंबईत असे दोन शोरूम उघडण्याची तयारी टेस्लाने सुरू केली आहे. या दोन शहरात शोरूमची सुरुवात झाल्यानंतर टेस्लाकडून भारतीय बाजारात पाऊल ठेवले जाईल. माध्यमांत आलेल्या बातम्यानुसार, एलॉन मस्कच्या कंपनीने २०२३ पासूनच शोरूमसाठी योग्य जागा शोधण्यास सुरुवात केली होती. मात्र काही कारणांमुळे याला उशीर झाला.

अनेक वर्षांपासून टेस्लाची प्रतिक्षा

टेस्ला अनेक वर्षांपासून भारतात पाऊल ठेवण्याचा विचार करत आहे. मात्र भरमसाठ आयात शुल्कामुळे टेस्लाने हा विचार मागे टाकला होता. मात्र आता सराकरने आपल्या धोरणात बदल केला आहे. ४० हजार डॉलर्सहून अधिक किमतीच्या आलिशान इलेक्ट्रिक वाहनांवरील सीमा शुल्क ११० टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर आणले गेले आहे. एकूण ७० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. या नव्या धोरणामुळे आता विदेशी कंपन्यांना भारतीय बाजारपेठ खुणावू लागली आहे.