चित्रपट सृष्टीतील अमूल्य योगदानासाठी महानायक अमिताभ बच्चन यांना भारतीय सिनेजगतातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अमिताभ बच्चन यांना गौरविण्यात आलं. या कार्यक्रमाला त्यांची पत्नी खासदार जया बच्चन आणि मुलगा अभिषेकही उपस्थित होता.

चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा महानायक अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला होता. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती. पण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला प्रकृती बरी नसल्यानं ते उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे हा पुरस्कार आज (२९ डिसेंबर) प्रदान करणार असल्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं होतं. रविवारी सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन अमिताभ बच्चन यांना सन्मानित करण्यात आलं.

पुरस्कार जाहीर झाला अन् मनात शंका आली…: बच्चन

राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी बोलताना बच्चन म्हणाले, “मला पुरस्कारासाठी पात्र समजलं. त्याबद्दल भारत सरकार, माहिती प्रसारण मंत्रालय आणि निवड समितीचे आभार. आई वडिलांचे आशीर्वाद आणि भारतीय जनतेच्या निष्ठापूर्वक प्रेमामुळे काम करता आलं. सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. नम्रतेने हा पुरस्कार स्वीकारत आहे. ज्यावेळी पुरस्काराची घोषणा झाली. त्यावेळी माझ्या मनात एक शंका आली की, हा पुरस्कार कशाचे संकेत आहे. भरपूर काम केलं, आता घरी बसा असा संदेश द्यायचा आहे का? अशी शंका माझ्या मनात आली. पण, मला अजून भरपूर काम करायचं आहे,” असं बच्चन यांनी सांगितलं.