जयपूर : सद्य:परिस्थितीत सरकारच्या विरोधात बोलायची सोय नाही. कारण तुम्ही त्यांच्या विरोधात बोललात की तुम्ही देशद्रोही ठरता, असे परखड मत अभिनेते अमोल पालेकर यांनी जयपूर साहित्य महोत्सवात व्यक्त केले. अमोल पालेकर यांच्या ‘द व्ह्यूफायंडर’ या आत्मचरित्रात्मक इंग्रजी पुस्तकाविषयी संजय रॉय यांनी अमोल पालेकर व संध्या गोखले यांच्याशी संवाद साधला त्यावेळी ते बाेलत होते. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्यावर टीका केली होती. त्याचदरम्यान शासनाने पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला. त्यावेळी पुलंनी हा पुरस्कार स्वीकारताना ‘जे लोक लोकशाही तंत्राने निवडून आले आहेत ते ठोकशाहीचा वापर करत आहेत’ अशी प्रखर टीका केली होती याची श्रोत्यांना आठवण करून दिली. परंतु आता तर अशी परस्थिती आहे की सरकार अशाप्रकारची कोणतीच टीका खपवून घेत नाही. उलट टीका करणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जाते.

यावेळी संवादात त्यांनी अभिनेता म्हणनू आपला प्रवास उलगडला. मला चित्रकार व्हायचं होतं आणि चित्रकार म्हणूनच मरायचं होतं. परंतु अपघाताने मी अभिनेता झालो. सुरुवातीच्या काळात बी. आर. चोपडा यांच्यासोबत काम करताना त्यांच्याशी आपल्या हक्काच्या चाळीस हजारांसाठी केलेल्या न्यायालयीन लढाईचा किस्सा सांगितला. माझ्या हक्काचे पैसे चोपडा यांनी देण्यास नकार देताच मी न्यायालयात गेलो. तेव्हा त्यांनी मला फिल्म इंडस्ट्रीतून बाहेर काढण्याची धमकी दिली. परंतु आपण त्यांच्यासमोर न नमता न्यायालयीन लढाई लढलो आणि त्यांच्याकडून व्याजासकट पैसे मिळवले. ते पैसे मी स्वत:साठी न वापरता सामाजिक कामासाठी दान केले. माझ्या हक्काचे पैसे मला मिळण्यासाठीच मी ही लढाई लढलो. इथे प्रश्न पैशांचा नव्हता तर तत्त्वांचा होता, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारच्या मदतीविना सुरू केलेल्या ‘मामि’ महाेत्सवाबद्दलचे राजकारण्यांचे अनुभवही सांगितले. या महोत्सवात मंचावर फक्त सिनेमा क्षेत्रातील दिग्गज उपस्थित असतील. राजकारणी पहिल्या चार रांगांमध्ये बसतील. आमच्या या मागणीला तत्कालीन राजकारण्यांनी विरोध केला. बाळासाहेब ठाकरे यांनी याविषयी विचरणा केली. परंतु आपले मत जाणून घेतल्यावर त्यांचा विरोध मावळला. राजकारण्यांच्या दबावाचा विचार न करता हा महोत्सव आपण यशस्वी केल्याचे त्यांनी सांगितले.

मी कधीच कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिलेला नाही आणि देणारही नाही. याबाबत पुस्तकात नमूद न केलेला परंतु आपल्या मनावर कायम कोरला गेलेला एक किस्सा त्यांनी सांगितला. आणीबाणीच्या वेळी मी सरकारविरोधात लढत होतो हे सगळ्यांना माहीत होतं. निवडणुका झाल्यावर इंदिरा सरकार पडलं आणि जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हा माझी जयप्रकाश नारायण यांची मुंबईत भेट झाली. आणीबाणीविरोधात मी कसा लढलो याबाबत त्यांना माहीत होतं. तेव्हा त्यांनी दिल्लीतील शपथविधीसाठी आमंत्रण दिलं. परंतु ते मी नम्रपणे नाकारलं आणि त्यांना सांगितलं, तुमच्या सरकारने चुकीचं काम केलं तरी मी त्याविरोधातही लढेन आणि तो माझा हक्क मी राखून ठेवावा असं मला वाटतं.

या संवादात त्यांनी आपल्या आयुष्यात सत्यदेव दुबे यांचे महत्त्व अधोरेखित करताना मी सत्यदेव दुबे यांना प्रश्न विचारण्याची हिंमत करायचो अशी आठवणही सांगितली. हल्ली प्रेक्षकांना ऋषिदांसारख्या सच्चे, दर्जेदार चित्रपटांची आवश्यकता वाटत नाही. याचे एक कारण म्हणजे प्रेक्षकांच्या मनावरही तुम्हाला असेच चित्रपट पाहायचे आहेत हे बिंबवले जात आहे.

Story img Loader