देशात कोणता बदल झालेला पाहायला आवडेल? असा प्रश्न ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी त्यावर सूचक उत्तर दिलं आहे. आपल्याला मोदींना स्कलकॅप (मुस्लीम समुदायाकडून वापरली जाणारी गोल टोपी) घातलेलं पाहायचंय, अशी अपेक्षा नसीरुद्दीन शाह यांनी व्यक्त केली आहे. ‘द वायर’ला दिलेल्या सविस्तर मुलाखतीमध्ये नसीरूद्दीन शाह यांनी लोकसभा निवडणूक निकाल, पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिसरी टर्म, देशातील अल्पसंख्याक समाजाची स्थिती अशा मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी नामांकित मुलाखतकार करन थापर यांनी मोदींबाबत विचारलेल्या या प्रश्नावर शाह यांनी सविस्तर भूमिका मांडली.

मुलाखतीमध्ये करन थापर यांनी नसीरुद्दीन शाह यांना नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्ममधील मंत्रीमंडळाबाबत विचारणा केली. “देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारमध्ये मुस्लीम समुदायाचा एकही प्रतिनिधी दिसत नाही. एनडीएमध्ये एकही मुस्लीम, ख्रिश्चन, शीख खासदार नाही. पण सरकारमध्ये मोदींनी एक शीख आणि एक ख्रिश्चन मंत्री नियुक्त केले आहेत. या स्थितीविषयी तुमचं मत काय?” असा प्रश्न नसीरुद्दीन शाह यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी उत्तर दिलं.

काय म्हणाले नसीरुद्दीन शाह?

यावेळी शाह यांनी भाजपामधील मुस्लीम द्वेष त्यांच्याही नियंत्रणाच्या बाहेर गेल्याचं विधान केलं. “हे निराशाजनक आहे. पण यात आश्चर्यजनक काहीही नाही. भाजपामध्ये मुस्लीमांबाबत असणारा द्वेष हा खूप आतपर्यंत मुरलेला आहे. तो आता त्यांच्याही नियंत्रणाच्या बाहेर गेला आहे. मला वाटत नाही की यावर ते काही करू शकतात. यावर मुस्लीम एकच गोष्ट करू शकतात. द्वेषाचं उत्तर द्वेषाने न देणं. जसं राहुल गांधी म्हणाले की ‘नफरत के बाजार मे मोहोब्बत की दुकान’. तो प्रयत्न आपण करायला हवा. आपण लगेच कोणत्याही विधानामुळे वाईट वाटून न घेता त्या विधानांच्या पलीकडे पाहायला हवं”, असं शाह आपल्या उत्तरात म्हणाले.

“मोदींनी कोणत्याही मुस्लिमाला कुठेही सहभागी करून घेतलेलं नाही. कारण त्यांना वाटतच नाही की मुस्लीम त्यासाठी पात्र असतील. हमीद अन्सारी जेव्हा उपराष्ट्रपती पदावरून निवृत्त होत होते, तेव्हाही मोदींनी त्यांची चेष्टा केली होती. ते म्हणाले होते की ‘आता तुम्ही तुमच्या मूळ विचारसरणीकडे परत जाऊ शकता’. त्यामुळे हे आपल्याला सगळ्यांना मिळून करावंच लागेल”, असं आवाहन नसीरुद्दीन शाह यांनी यावेळी केलं.

“मोदींनी स्कलकॅप घालावी”

दरम्यान, मोदींनी स्कलकॅप (मुस्लीम समुदायाकडून प्रामुख्याने वापरली जाणारी गोल टोपी) घालावी, अशी अपेक्षा नसीरुद्दीन शाह यांनी व्यक्त केली आहे. “मोदींना डोक्यावर टोपी घालायला फार आवडतं असं दिसतंय. मला त्यांनी स्कलकॅप घातलेलं पाहायला आवडेल”, असं ते म्हणाले. आपल्या या विधानामागचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं.

“मुस्लिमांना शिक्षणापेक्षा सानिया मिर्झाच्या स्कर्टच्या लांबीची जास्त चिंता”, अभिनेते नसिरूद्दीन शाह यांचं विधान; म्हणाले, “हिंदू-मुस्लीम एकोपा दिसल्याची ‘ती’शेवटची वेळ!”

“मुस्लिमांकडे अशी कोणती व्यक्ती नाही जिला ते त्यांचा नेता म्हणून स्वीकारू शकतील. नेता मुस्लीमच असला पाहिजे असं गरजेचं नाही. पण तो मुस्लिमांशी अशा गोष्टी बोलणारा असावा ज्यात खरंच अर्थ आहे. ती व्यक्ती अशी असायला हवी जिला मुस्लीम कोणत्याही आक्षेपाशिवाय स्वीकारू शकतील. मला द्वेषपूर्ण विधानांचा शेवट हवाय”, असं शाह म्हणाले.

“मोदींचा इगो फार मोठा आहे”

“मोदींनी त्यांची विधानं नियंत्रणात ठेवण्याची अपेक्षा ठेवणं जरा जास्त होईल. कारण त्यांचा इगो फार मोठा आहे. त्यामुळे त्यांना त्यांची कुठे चूक झाली आहे हे कधीच मान्य होणार नाही. त्यामुळे त्यांनी फक्त स्कलकॅप घातली तर तो एक चांगला संदेश होऊ शकेल”, असं शाह म्हणाले.

“त्यांनी मागे एका कार्यक्रमात स्कलकॅप घालण्यास नकार दिला होता. तो प्रकार विसरणं अवघड आहे. पण जर त्यांनी स्कलकॅप घातली तर त्यातून ते हा संदेश देऊ शकतील की ‘मी तुमच्यापेक्षा वेगळा नाही. आपण दोघे या देशाचे नागरिक आहोत’. जर त्यांना या देशाच्या मुस्लिमांना आपलंसं करायचं असेल, तर या कृतीचा त्यांना फायदा होऊ शकेल. कदाचित यातून हे दिसून येईल की त्यांनी मुस्लीमदेखील या देशाचे नागरिक आहेत, या वास्तवाचा स्वीकार केला आहे”, असं विधान यावेळी नसीरुद्दीन शाह यांनी केलं.