पीटीआय, हैदराबाद
ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे बुधवारी निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मंगळवारी हैदराबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत.मालिनी राजूरकर यांचे ‘ख्याल’ आणि ‘टप्पा’ या गायन प्रकारांवर विशेष प्रभुत्व होते. अभिजात संगीताच्या प्रचारासाठी त्या सतत प्रयत्नशील राहिल्या. ग्वाल्हेर घराण्याची परंपरा समृद्ध करणाऱ्या वझेबुवा आणि त्यांचे गुरुजी निसार हुसेनखाँ, भूगंधर्व रहिमतखाँ, वासुदेवबुवा जोशी, पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर, ओंकारनाथ ठाकूर यांची परंपरा कायम ठेवणारा आवाज म्हणून त्यांची ख्याती होती.
मालिनी राजूरकर यांचा जन्म १९४१ मध्ये अजमेर येथे झाला. त्यांची जडणघडण तिथेच झाली. गणित या विषयात पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी अजमेरमधील सावित्री माध्यमिक शाळा व महाविद्यालयात तीन वर्ष गणिताचे अध्यापन केले. त्यानंतर त्यांना कला विषयात तीन वर्षांची शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यांनी आपली संगीताची आवड पुढे जोपासली. अजमेर संगीत महाविद्यालयात गोविंदराव राजूरकर आणि त्यांचा पुतण्या वसंतराव राजूरकर यांच्याकडे संगीताचे पुढील धडे घेतले. पुढे वसंतराव राजूरकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
हेही वाचा >>>पंतप्रधानांकडून मंत्र्यांसाठी नियमावली; जी-२० शिखर परिषदेसाठी केंद्र सरकारकडून तयारी पूर्ण
मालिनी राजूरकर यांच्या निधनाने आपण एका महान गायिकेला, संगीतकाराला, इतकेच नव्हे, तर संतसदृश विभूतीला मुकलो आहोत. त्यांच्या गाण्याने त्यांनी वर्षांनुवर्षे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात आपली सेवा रुजू केली आणि रसिकांना आनंद दिला. पैसा आणि मानसन्मान यांचा मोह नसलेले एक सांगीतिक व्यक्तिमत्त्व असेच त्यांचे वर्णन करता येईल. –श्रीनिवास जोशी, कार्याध्यक्ष, आर्य संगीत प्रसारक मंडळ
मालिनी राजूरकर यांचे व्यक्तिमत्त्व हे आपल्या घरातील आई आणि आजीसारखे लोभस होते. प्रामाणिकपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात ओतप्रोत भरला होता. त्यांच्यासारखे गाणे होणे नाही. साधेसोपे, तरीही गायला कठीण अशा पद्धतीचे त्यांचे गाणे होते. टप्पा, नाटय़गीत याबरोबरच ग्वाल्हेर घराण्याची शास्त्रीय आणि परिपूर्ण गायकी त्यांच्या गळय़ात होती. त्यांचा प्रामाणिक, सोज्वळ सूर आता पुन्हा प्रत्यक्ष ऐकायला मिळणार नाही, ही खंत आहे. – राहुल देशपांडे, गायक
हेही वाचा >>>‘इंडिया विरुद्ध भारत’ वाद आणखी तीव्र
मालिनी राजूरकर यांचे गाणे लहानपणापासून ऐकत आलो. त्यांच्या गाण्यात ग्वाल्हेर घराण्याची आक्रमकता दिसते. टप्पा गायकीमध्ये त्यांनी खूप नाव मिळवले होते. आजच्या पिढीला टप्पा गायकीची ओळख त्यांनी करून दिली. त्यांचे गाणे आक्रमक असले, तरी त्यांचा स्वभाव नम्र, मृदू, निगर्वी होता. त्या रसिकांना खूश करण्यासाठी गायच्या नाहीत, तर त्यांच्या गाण्याने रसिक खूश व्हायचे. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे. –पं. उल्हास कशाळकर, ज्येष्ठ गायक
अतिशय तत्वनिष्ठ, सांगीतिक मूल्यांशी तडजोड न करणाऱ्या अशा त्या कलावंत होत्या. त्यांचे दडपण असायचे, पण त्यांच्याकडून शिकायलाही खूप मिळाले. ग्वाल्हेर घराण्याचे गाणे मर्दानी असले, तरी त्या स्त्रीसुलभ पद्धतीने गायच्या. टप्पा हा प्रकार त्यांनी लोकाभिमुख केला. त्या अतिशय उत्तम गायिका तर होत्याच, पण त्यांचे व्यक्तिमत्त्व पारदर्शी होते. –सुयोग कुंडलकर, संवादिनीवादक
ग्वाल्हेर घराण्याचे स्वच्छ गायन ही मालिनीताईंच्या गायकीची खरी ओळख. आत्ताच्या काळात जुनेजाणते प्रतिभावंतही प्रसिध्दीच्या मागे धावताना दिसतात. मालिनीताईंना मात्र कुठला हव्यासही नव्हता. त्यांच्या स्वभावात अहंकाराचा लवलेशही नव्हता. मालिनीताईंचे पती वसंतराव यांनी त्यांना गायकीचे अप्रतिम शिक्षण दिले होते. त्यांनीही गाण्यावर नितांत श्रध्दा ठेवून आपली कलासाधना वाढवत नेली. टप्पा त्या उत्तम गात असत. एखाद्या पूजेला बसताना जसे मन पवित्र, निर्मळ, शांत होते तोच भाव त्यांचे गाणे ऐकताना जाणवत असे. त्यांचे गाणे सदैव रसिकांच्या स्मरणात राहील. -डॉ. पंडित अजय पोहनकर, ज्येष्ठ शास्त्रीय गायक
मालिनीताई जितक्या उच्च दर्जाच्या कलाकार होत्या तेवढय़ाच साध्या आणि प्रेमळ होत्या. संगीत सृष्टीसाठी हा फारच मोठा आघात आहे. एक शास्त्रीय संगीतातील ग्वाल्हेर गायकीचा खणखणीत प्रामाणिक असा सच्चा सूर अर्थात महत्वाचा असा ‘टप्पा’ गळून पडला. त्यांच्यासारख्या कसबी आणि हमखास मैफिल रंगवणाऱ्या कलावंत फार कमी होतात. त्यांना शतश: नमन. – मुकुंद मराठे, ज्येष्ठ गायक, संगीत अभ्यासक