छत्तीसगढमधील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विद्याचरण शुक्ल (वय ८४) यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले. शुक्ल यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
छत्तीसगढमधील बक्सर जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांनी कॉंग्रेसच्या परिवर्तन रॅलीवर गेल्या महिन्यात हल्ला केला होता. हल्ल्यामध्ये कॉंग्रेसचे राज्यातील नेते महेंद्र कर्मा, प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल यांच्यासह इतर नेते मृत्युमुखी पडले आहेत. याच हल्ल्यामध्ये विद्याचरण शुक्ल गंभीर जखमी झाले होते. एअर ऍम्ब्युलन्सने शुक्ल यांना दिल्लीला हलविण्यात आले होते. गंभीर जखमी झालेले असल्यामुळे त्यांच्यावर मेदांता रुग्णालयातील अतिदक्षता विभागात २६ मेपासून उपचार सुरू होते. गेल्या आठवड्यात त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र, सोमवारी जंतूसंसर्गामुळे त्यांची प्रकृती खालावली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran congress leader v c shukla dead