आपल्या मखमली, मधुर आवाजाने कानसेनांवर मोहिनी घालणाऱ्या ज्येष्ठ गायक मन्ना डे यांच्या आयुष्यात विरोधाभास ठासून भरला होता. त्यांचा आवाज कुठल्याही चौकटीत बसणारा नव्हता. पण, तसा तो नव्हता म्हणूनच की काय ठरावीक नायक प्रधान चित्रपटसृष्टीत अमुक एका नटाला म्हणून त्यांचा आवाज असावा, असे कधी त्यांच्याबाबतीत घडले नाही. त्यांच्या अभिजात गायकीसाठी ते प्रसिध्द होते पण, त्यांना जे गायचे होते ते कित्येकदा या चित्रपटसृष्टीने त्यांना गाऊ दिले नाही. तरीही अतिशय संयमाने आणि विनम्रतेने वागणाऱ्या मन्ना डे यांचा अखेरचा सूर हरपला. प्रदीर्घ आजाराशी झगडणाऱ्या मन्ना डे यांचे गुरुवारी पहाटे बेंगळुरू येथील रुग्णालयात निधन झाले.
गेले पाच महिने मन्ना डे यांच्या प्रकृतीचा सूर बिघडलेलाच होता. या पाच महिन्यांत अनेकदा मन्ना डे यांना बंगळूरू येथील नारायण ह्रदयालय रुग्णालयातून सारखी जा ये करावी लागली होती. मूत्रपिंडाच्या विकारासाठी त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र, बुधवारी त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ताबडतोब रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. अखेर पहाटे त्यांचे निधन झाले, असे रुग्णालयाचे प्रवक्ते वासुकी यांनी सांगितले. त्यांची मुलगी सुश्मिता देव आणि जावई जनरंजन देव हे अखेरच्या क्षणी त्यांच्याबरोबर होते. मन्ना डे यांच्या पत्नीचे गेल्यावर्षी जानेवारीत निधन झाले होते. १९५० ते १९७० या कालावधीत ज्या गायकांनी आपल्या वैविध्यपूर्ण आवाजांनी चित्रपटसृष्टीवर वर्चस्व गाजवले त्यांच्यात एक मोठे आणि किंबहुना अखेरचे म्हणता येईल असे नाव होते मन्ना डे.
मोहम्मद रफी, मुकेश, किशोर कु मार आणि मन्ना डे या चौकडीशिवाय चित्रपट संगीताची कल्पना करणे अशक्य आहे. किशोर कुमार आणि मोहम्मद रफी या दोघांचे आवाज ही जशी चित्रपटसृष्टीतील प्रमुख नायकांची ओळख बनले होते. तसे दुर्दैवाने मन्ना डे यांच्याबाबतीत झाले नाही किंवा तसे होऊ दिले गेले नाही. पण, मन्ना डे यांच्या आवाजातच अशी जादू होती की त्यांच्या सदाबहार गाण्यांमुळे आपोआप सगळे पुरस्कार, मानसन्मान मन्ना डे यांना मिळाले होते. त्यांना राष्ट्राचा गायक म्हणून मान होता. शिवाय, भारत सरकारने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण किताब देऊन सन्मानित केले होते.
तीन पिढय़ांना आपल्या गाण्यांनी रिझवणाऱ्या मन्ना डे यांच्या आयुष्यातला विरोधाभास हा त्यांच्या अखेरच्या क्षणीही त्यांच्या चाहत्यांना दु:खी करून गेला. हिंदूी चित्रपटसृष्टी ही त्यांची कर्मभूमी होती. त्यांनी मराठी, पंजाबी, भोजपुरी, मल्याळम, बंगाली अशा अनेक भाषांमधून गाणी गायली होती. पण, या अभिजात स्वर लाभलेल्या गायकाने अखेरचा श्वास घेतला तो बंगळुरूमध्ये. त्यांचे पार्थिव तेथील रविंद्र कलाक्षेत्र येथे चाहत्यांना अखेरचे दर्शन घेण्यासाठी ठेवण्यात आले होते. मात्र, तिथे त्यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील सहकारी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांचे सहकारी नव्हते की चाहत्यांची गर्दीही नव्हती. इतक्या दिग्गज कलाकाराने इतक्या शांततेत निघून जावे, ही बाब त्यांच्या चाहत्यांना निराश करून गेली.
- मन्ना डे यांचे अल्पचरित्र आणि लोकप्रिय मराठी-हिंदी गाण्याची यादी
- पहा:’मन्ना डे’ यांची प्रसिद्ध गाणी
- फोटो गॅलरी : आठवणीतले मन्ना डे
‘धुंद आज डोळे’ची अमेरिकेत फर्माईश – प्रभाकर जोग (संगीतकार)
‘प्रहार’ चित्रपटातील एका गाण्याच्या ध्वनिमुद्रणासाठी मन्ना डे मुंबईत आले होते. पूर्वी माझ्याकडे ते गायले होते. त्यामुळे त्यांच्याशी परिचय होता. त्यावेळी गप्पा मारताना मन्ना डे यांनी मी संगीत दिलेल्या आणि त्यांनी गायलेल्या ‘धुंद आज डोळे, हवा धुंद झाली’ या गाण्याच्या लोकप्रियतेची एक आठवण सांगितली.
मन्ना डे मला म्हणाले, काही वर्षांपूर्वी मी अमेरिकेत गेलो होतो. माझ्या गाण्यांचा कार्यक्रम सुरू असताना मध्येच श्रोत्यांकडून चिठ्ठी आली. त्यात ‘धुंद आज डोळे’ हे गाणे म्हणा, अशी खास फर्माईश त्या श्रोत्याकडून करण्यात आली होती. मी म्हटले, अहो हे गाणे मी खूप वर्षांपूर्वी म्हटले असून आता त्याचे शब्द मला आठवत नाहीत. तर श्रोत्यांमधून आम्ही शब्द देतो, पण तुम्ही हे गाणे म्हणाच, असा आग्रह झाला. अखेर श्रोत्यांसाठी मी ते गाणे म्हटले.
इतक्या वर्षांनंतरही हे गाणे लोकांच्या आठवणीत कसे? असे त्यांनी मला विचारले, त्यावर, ‘अहो, तुमच्या आवाजामुळे ते आजही लोकप्रिय आणि आठवणीत राहिले आहे. त्यावर त्यांनी हसत हसत अरे, पण तुझ्या संगीताचा/ चालीचाही त्यात मोठा वाटा आहे, अशा शब्दांत मन्ना डे यांनी माझेही कौतुक केले. संगीतकाराकडून गाणे शिकताना आणि गातांना ते गंभीर असायचे. गाण्यापूर्वी गाण्याचे नोटेशन ते स्वत: लिहून काढायचे. त्यामुळे गाण्याची चाल त्यांच्या लक्षात राहायची. तसेच गाण्याचा अर्थ समजावून घेऊन ते गायचे. मन्ना डे हे फक्त शास्त्रीय संगीताचा बाज असलेली गाणी गातात, असा एक समज होता. पण इतरही वेगळ्या बाजाची गाणी ते उत्तम गायचे नव्हे त्यांनी ती म्हटलीही आहेत.
समर्पण वृत्तीला सलाम – लता मंगेशकर
अभिजात गायकी असलेल्या दिग्गज मन्ना डे ज्यांना आम्ही प्रेमाने मन्ना दा म्हणत असू त्यांचे आज निधन झाले. मन्ना दा अतिशय आनंदी आणि सहजस्वभाव असलेला माणूस होता. १९४७ -४८ मध्ये संगीतकार अनिल बिस्वास यांच्याकडे मन्ना दा यांच्याबरोबर मी शास्त्रीय गाणे गायले होते. मन्ना दांबरोबर गायलेले ते माझे पहिले गाणे होते. त्यानंतर आम्ही एकत्र भरपूर गाणी गायली. त्यांच्या समर्पण वृत्तीला माझा सलाम. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
दिग्गज हरपला – अमिताभ बच्चन</strong>
संगीतविश्वातील दिग्गज मन्ना डे यांची गाणी आणि त्यांच्या आठवणींनी आज मन भरून गेले आहे. आश्चर्य म्हणजे किती सहजतेने आपण आपल्या आयुष्यातील कित्येक घटना सहजपणे त्यांच्या गाण्यांशी जोडून घेत असतो. मी आज सेटवर आहे पण, काम सुरू करण्यापूर्वी मिनिटभर शांत राहून त्यांच्या आठवणींना उजाळा द्यायचा आहे. त्यांनी ‘मधुशाला’साठी दिलेले योगदान अमूल्य होते. त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो.
ख्यातनाम गायक हरपला- आनंदजी शहा
चित्रपट संगीतात सुवर्ण युग उभा करणारा एक दिग्गज कलाकार काळाच्या पडद्याआड गेला . हिंदी चित्रपटसृष्टीतील गायकांमध्ये त्यांनी सर्व प्रथम आपली कारर्किर्द सलद मेहमूद, किशोर कुमार, मोह्हमद रफी, मुकेश अशा एकापेक्षा एक दिग्गज गायकांशी समकावील असणारे मन्ना डे शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि पाश्चात्य संगीत. या तिनही प्रकारच्या गायकिचा बाज अचूक उचलला होता. आम्हालाही त्यांच्यासह काम करण्याचे भाग्य लाभले.. यारी हे इमान मेरा, कसमे वादे अशी अवीट गोडीची गाणी त्यांनी आमच्यासाठी गायली. राजकपूर यांची रोमॅंन्टीक प्रतिमा उभी करण्यामागे मन्ना डे यांचा मोलाचा वाटा होता. ‘ए भाय़ जरा देख के चलो’, ‘एक चतूर नार’ अशी धम्माल गाणी फक्त मन्ना डे यांनीच गायली.
आम्ही मन्ना डेंसह गेली साठ वर्षे एकत्र काम केले होते. संगीताच्या क्षेत्रात त्यांच्यासमोर आम्ही लहानच मात्र, आमच्या संगीत दिग्दर्शनाखाली गातानाही प्रत्येक गाणे खूप अभ्यासपूर्ण शिकायचे. गेल्याच वर्षी एका कायर्कमाच्या निमित्ताने आम्ही भेटलो त्यावेळी, आपण एकत्र पुन्हा काय तरी करू असे ते म्हणले मात्र, तो योग काही आला नाही.
गोल्डन व्हॉईस गमावला – मुख्यमंत्री
विविध भारतीय भाषांमधील गाणी गाऊन भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक आगळा-वेगळा ठसा उमटविणाऱ्या मन्ना डे यांच्या निधनाने देशाने ‘गोल्डन व्हाईस’ गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला.
‘तमन्ना’ या चित्रपटाच्या माध्यमातून १९४२ साली पार्श्वसंगीत क्षेत्रात पदार्पण केलेल्या मन्ना डे यांनी ४००हून अधिक गाणी म्हटली. केवळ हिंदीच नव्हे तर मराठी, बंगाली, आसामी, मल्याळम तसेच कन्नड, गुजराथी, कोकणी अशा अनेक भाषांमधून गाणी गाऊन संगीताला कुठलीही सीमारेषा नसते, हे त्यांनी सिद्ध केले. त्यांची अनेक गाणी इतकी लोकप्रिय झाली आहेत की, ती आजही सहजपणे आठवतात. कमी वयात गायक म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करून अनेक वर्षे सिनेरसिकांच्या मनावर राज्य केलेल्या मन्ना डे यांनी पद्मश्री, पद्मभूषण, दादासाहेब फाळके असे अनेक सर्वोच्च पुरस्कार मिळविले होते, यातच त्यांची महानता लक्षात येते. त्यांच्या निधनाने एक चतुरस्त्र गायक आपण गमावला असला, तरी त्यांच्या सुमधुर गाण्यांमधून ते कायम आपल्यातच राहतील, असेही चव्हाण यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.