उदयपूरमधील शिवणकाम करणाऱ्या व्यक्तीच्या हत्येनंतर गुजरातनंतर आता हरियाणा राज्यातही विश्व हिंदू परिषदेने (VHP) एक हेल्पलाईन प्रसिद्ध केली आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून विश्व हिंदू परिषदेकडून हिंदू समाजातील व्यक्तींना शस्त्र परवाने मिळवून देण्यासाठी मदत केली जाणार आहे. हरियाणातील गुरगाव येथे VHP तर्फे आयोजित करण्यात बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला VHP तसेच बजरंग दलाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा >> ‘ज्यांचं रक्त भगवं ते उद्धव ठाकरेंसोबत,’ शिवसेना संपली म्हणणाऱ्यांना आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
काही दिवसांपूर्वी निलंबित भाजपा नेत्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे समर्थन केल्यामुळे उदयपूर येथील कन्हैयालाल या शिवणकाम करणाऱ्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर हिंदूंना शस्त्र परवाना मिळवून देण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने एक हेल्पलाईन जारी केली आहे. देशात जिहादी शक्तींकडून धार्मिक कट्टरवादाचा पुरस्कार केला जातोय. याच कारणांमुळे हिंदू समाजातील व्यक्तींना मदत करण्यासाठी ही हेल्पलाईन जारी केली आहे, असे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. ज्या हिंदूंना धमक्या येत आहेत, त्यांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परावाना मिळवून देण्यासाठी आम्ही मदत करु, असे VHPने सांगितले आहे.
हेही वाचा >> ‘शब्द काळजीपूर्वक वापरा,’ राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांना नरेंद्र मोदींचा सल्ला
“स्वसंरक्षणाचा अधिकार सर्वांनाच बहाल करण्यात आलेला आहे. सध्याचे वातावरण पाहता. एखाद्या व्यक्तीला स्वसंरक्षणार्थ शस्त्र हवे असेल तर त्यात चुकीचे काय आहे? आमचा त्याला पाठिंबा आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून हिंदूंना शस्त्र परवाना मिळवून देण्यासाठी मदत केली जाईल. कोणाला धमकी मिळत असेल आणि त्याला संरक्षणासाठी शस्त्र हवे असेल तर आम्ही मदत करू. प्रशासनाशी बोलून आम्ही त्यांना परवाना मिळवून देऊ. कायद्याचा चौकटीत राहूनच ही सर्व प्रक्रिया केली जाईल,” असे हरियाणा विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष पवन कुमार यांनी सांगितले.
हेही वाचा >> भाजपच्या तीन खासदारांवर कारवाईची मागणी ; चित्रफीतप्रकरणी लोकसभा अध्यक्षांना काँग्रेसचे आवाहन
“देशविरोधी शक्तींना देश कमकुवत करायचा आहे. हिंदूंना मारले जात आहे. नुपूर शर्मा यांना धमकावले जात आहे. हिंदू देव-देवतांचा अपमान करणारे पोस्टर्स शेअर केले जात आहेत. याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. याच कारणामुळे आम्ही शांत न बसण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या जिहादीने हिंदूंना धमकी दिली, तर मदतीसाठी आम्ही हेल्पलाईन जारी केली आहे. या नंबरवर कॉल करातच हिंदूंना मदत केली जाईल. तसेच पोलिसात गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई केली जाईल. समाजमाध्यमांवर कोणी आक्षेपार्ह पोस्ट लिहिली तरीही आम्ही कायदेशीर कारवाई करु. हे करताना आम्ही कायदा हातात घेणार नाही,” असे देखील पवन कुमार यांनी सांगितले.
हेही वाचा >> “जो टेलिप्रॉम्प्टर नियंत्रित करतो तोच खरा राष्ट्रपती!” इलॉन मस्क यांचा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर निशाणा
दरम्यान, याआधी विश्व हिंदू परिषदतर्फे गुजरातमध्ये हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आला होता. यावेळीदेखील हिंदूंना आर्थिक आणि कायदेशीर मदत देणार असल्याचे बंजरंग दलातर्फे सांगण्यात आले होते. गुजरात विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस अशोक रावल यांनी ही माहिती दिली होती.