अयोध्येतील राम मंदिराच्या आंदोलनात आणि रथयात्रेत ज्यांनी महत्त्वाचा सहभाग घेतला होता त्या लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना विहिंपने म्हणजेच विश्व हिंदू परिषदेने राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण दिलं आहे. त्यावर या दोघांनीही उत्तर दिलं आहे.
राम मंदिर ट्रस्टने काय म्हटलं आहे?
भाजपाचे दिग्गज नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे त्यांच्या प्रकृती आणि वयामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या राममंदिराच्या अभिषेक सोहळ्यात उपस्थित राहण्याची शक्यता नाही, असे मंदिराच्या ट्रस्टने सोमवारी सांगितले आहे.
२२ जानेवारी रोजी होणाऱ्या अभिषेक सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. १५ जानेवारीपर्यंत तयारी पूर्ण केली जाईल आणि रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा १६ जानेवारीपासून सुरू होईल आणि २२ जानेवारीपर्यंत चालू असणार आहे. निमंत्रितांची तपशीलवार यादी देताना राय म्हणाले की, अडवाणी आणि जोशी कदाचित आरोग्य आणि वयाशी संबंधित कारणांमुळे अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. आडवाणी आता ९६ वर्षांचे आहेत आणि जोशी पुढच्या महिन्यात ९० वर्षांचे होतील. असं म्हटलं होतं. त्यानंतर आता विश्वहिंदू परिषदेने या दोघांनाही निमंत्रण दिलं आहे.
काय म्हटलं आहे लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशींनी?
या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी हे निमंत्रण स्वीकारलं आहे. या दोघांनीही म्हटलं आहे की राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करु. विहिंपचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी X या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर ही माहिती दिली आहे. लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे राम मंदिराच्या आंदोलनातले दोन प्रमुख चेहरे होते. आडवाणी यांनी काढलेल्या रथयात्रेमुळे राम मंदिराचा प्रश्न हा देशभरात व्यापक स्वरुपात उभा राहिला होता. आता या मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्यासाठी या दोघांनाही निमंत्रण दिलं आहे. या दोघांनीही आम्ही जरुर प्रयत्न करु असं म्हटल्याचं आलोक कुमार यांनी सांगितलं आहे. ANI ने हे वृत्त दिलंं आहे.
१९८५ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडून भाजपाची सूत्रे हाती आल्यानंतर लालकृष्ण आडवाणी यांनी १९८९ या वर्षी अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरून आव्हानात्मक मोहीम राबवली. हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथे भाजपा अधिवेशनात राम मंदिर उभारणीचा ठराव संमत करण्यात आला. हा ठराव भाजपा आणि देशातील रामभक्तांसाठी ऐतिहासिक ठरला. राम मंदिरासाठी लालकृष्ण आडवाणी यांनी रथयात्रा काढायची हे ठरवल्यानंतर तत्कालीन रणनीतीकार प्रमोद महाजन यांनी या रथयात्रेची कल्पना सुचवली होती. त्यानुसार, लालकृष्ण आडवाणी यांच्या नेतृत्त्वाखाली १९९० साली रथयात्रेतून राम मंदिराच्या उभारणीची माहिती शहरांत, खेडोपाड्यांत पोहोचली होती.
भाजपाच्या प्रभावी मोहिमांपैकी एक बहुचर्चित ठरलेली ही रथयात्रा तितकीच वादग्रस्त सुद्धा ठरली होती. बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी या रथयात्रेला रोखले होते. तर काही ठिकाणी यात्रेतून दिल्या जाणाऱ्या घोषणा या मुस्लिमविरोधी असल्याचे म्हटले गेले होते.