VHP launches campaign: तिरुपती देवस्थान मंदिरात प्रसादातील भेसळ प्रकरण सध्या वादात असताना विश्व हिंदू परिषदेने मंगळवारी (दि. २४ ऑक्टोबर) सरकारविरोधात देशव्यापी आंदोलन छेडण्याची घोषणा केली. सरकारने मंदिरावर नियंत्रण आणले असून सरकारने नेमलेल्या समितीकडून भ्रष्टाचार होत आहे, असा आरोप विश्व हिंदू परिषदेकडून (VHP) करण्यात आला. मुघल आणि ब्रिटीश राजवटीत मंदिरांबद्दल जो दृष्टीकोन ठेवला गेला होता, तसाच दृष्टीकोन सरकारकडून ठेवला जात आहे, असा आरोपही व्हीएचपीकडून करण्यात आला.

सुरेंद्र जैन पत्रकार परिषदेत म्हणाले की, सरकारकडून मंदिराच्या संपत्तीची लूट केली जात आहे. ज्यांना सरकारमध्ये सामावून घेता येत नाही, अशा नेत्यांना मंदिर समितीवर नेमण्यात येते. तसेच तिरुपती येथील प्रसादामध्ये भेसळ आढळल्या प्रकरणी ते म्हणाले की, प्रसादाच्या लाडूमध्ये जनावरांची चरबी आढळल्यामुळे संपूर्ण हिंदी समाजाच्या भावना दुखावल्या असून असंतोष पसरला आहे. तसेच केरळच्या शबरीमाला आणि इतर महत्त्वाच्या मंदिरातील प्रसादातही भेसळ झाल्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले. याप्रकारचे कृत्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

हे वाचा >> बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराच्या घटनांनंतर हिंदू महासभा आक्रमक; ग्वाल्हेरमधील भारत-बांगलादेश सामन्याच्या दिवशी पाळणार ‘बंद’

प्रसादात भेसळ होत असलेल्या मंदिरांमधील समान धागा म्हणजे, ही सर्व मंदिरे सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत. सरकारच्या ताब्यात असलेली मंदिरे पुन्हा समाजाच्या ताब्यात देणे, हाच या समस्येतून मुक्ती मिळविण्याचा पर्याय आहे. समाज संतांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची देखभाल करण्यास सक्षम आहे, असेही सुरेंद्र जैन म्हणाले.

मुस्लीम त्यांच्या संस्था चालवितात मग हिंदू का नाही?

सरकारने मंदिरांवर नियंत्रण ठेवणे असंवैधानिक असल्याचे सांगत सुरेंद्र जैन यांनी अनुच्छेद १२ चा दाखला दिला. राज्याला धर्म नसतो, असे या अनुच्छेदात म्हटले आहे. मग राज्य सरकारला मंदिराचे नियंत्रण करण्याचा अधिकार कोण देतो? अनुच्छेद २५ आणि २६ द्वारे आम्हाला आमच्या संस्था चालविण्याचा पूर्ण अधिकार प्राप्त होतो. जर मुस्लीम त्यांच्या धार्मिक संस्था चालवू शकतात तर हिंदू का नाही? असाही सवाल सुरेंद्र जैन यांनी उपस्थित केला.

हे ही वाचा >> Vishva Hindu Parishad : काशी- मथुरा मंदिरे व वक्फ विधेयक विश्व हिंदू परिषदेच्या अजेंड्यावर; ३० निवृत्त न्यायाधीशांची बैठकीला उपस्थिती

हिंदूंचा पैसा हिंदूसाठी

मुस्लीम आक्रमणकाऱ्यांनी आपल्या मंदिरांची लूट केली. ब्रिटिश त्यांच्याहून हुशार होते, त्यांनी थेट मंदिराचे नियंत्रण मिळविले. याच प्रकारे सरकारचाही हेतू दिसतो. समिती वैगरे स्थापन करून मंदिराचा ताबा मिळविला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळालेले असले तरी दुर्दैवाने भारतातील राजकारणी ब्रिटिश आणि मुघल मानसिकतेतून बाहेर आलेले नाहीत. मंदिरावर नियंत्रण मिळविण्याचा त्यांचा हा प्रयत्न आक्रमणकाऱ्यांपेक्षा वेगळा नाही. आता हे संपवायला हवे. त्यामुळे “हिंदूंचा पैसा हिंदूसाठी”, अशी घोषणा आम्ही देत आहोत.

तमिळनाडू सरकराच्या ताब्यात जवळपास ४०० हून अधिक मंदिरे आहेत. मागच्या १० वर्षांत या मंदिरांचे ५० हजार कोटींचे नुकसान झाले आहे, असाही आरोप जैन यांनी केला. आंदोलनाच्या सुरुवातीला प्रत्येक राज्याच्या राजधानीत मोर्चा काढला जाईल. तसेच मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येईल. भाजपाशासित राज्यातही हे का होत नाही? असा प्रश्न विचारला असता जैन म्हणाले की, आमची पूर्वीपासून हीच मागणी आहे. आता त्यासाठीच आम्ही देशव्यापी मोहीम हाती घेत आहोत.