विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी खळबळजनक विधान केलं आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेचा संदर्भ देत त्यांनी केलेल्या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील गोकुलधाम सोसायटीमध्ये नेहमी आनंद का असतो? असा प्रश्न विचारत त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.
साध्वी प्राची यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील गोकुलधाम सोसायटीमध्ये नेहमी आनंद का असतो? कारण या मालिकेतील अब्दुल सोसायटीच्या बाहेर राहतो.” त्यांच्या बोलण्याचा रोख मुस्लिमांकडे होता. त्यांच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी साध्वी प्राची यांच्या विधानाचा निषेध केला आहे. त्यांचं हे ट्वीट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे साध्वी प्राची यांनी अलीकडेच श्रद्धा वालकर हत्याप्रकरणावरून चितावणीखोर विधान केलं होतं. आफताब पूनावाला याने श्रद्धाचे ३५ तुकडे केले आहेत, त्यामुळे हिंदुंनी आफताफचे ५०० तुकडे करावेत, असं विधान त्यांनी केलं. तसेच आपल्या मुलींच्या सरंक्षणासाठी कायदा हातात घ्यायची वेळ आली तर खुशाल कायदा हातात घ्यावा, असं वक्तव्य साध्वी प्राची यांनी केलं होतं. त्या उत्तर प्रदेशातील बरेली येथील पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
हेही वाचा- “आयएमए’च्या लोकांनो वाटीभर पाण्यात बुडून मरा, बाबा रामदेव यांनी कोट्यवधी लोकांना बरं केलंय”
यावेळी साध्वी प्राची यांनी मदरशांबाबतही मोठं वक्तव्य केलं. “मदरशांमध्ये दहशतवादी बनवले जातात, अशा मदरशांवर बुलडोझर चढवला पाहिजे. हिंदु मुलींना लव्ह जिहादमध्ये कसे अडकवायचे, यासाठी भारतात अत्यंत नियोजनपूर्व पद्धतीने कट रचला जात आहे. देशात लव्ह जिहादची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. हिंदू मुलेही इतर धर्मातील मुलींशी लग्न करतात, पण ते कधी मुलीचे असे ३५ तुकडे करत नाही” असं विधान साध्वी प्राची यांनी केलं.