छत्तीसगढमधील बेमेतरा भागात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर आता विश्वहिंदू परिषदेने मुस्लीम आणि ख्रिश्चन समुदायावर आर्थिक बहिष्कार टाकण्याची शपथ घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यावेळी भाजपाचे माजी खासदारही उपस्थित असल्याने काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ८ एप्रिल रोजी छत्तीसगढच्या बेमेतरा भाग दोन गटांत हिंसाचार झाला होता. या हिंचारादरम्यान एका युवकाचा मृत्यू झाला, तर तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी विश्व हिंदू परिषदेकडून ‘छत्तीसगढ बंद’ची हाक देण्यात आली. तसेच निषेध मोर्चादेखील काढण्यात आला. हा मोर्चा आमगुडा चौकात पोहोचताच विहिंपचे नेते मुकेश चांडक यांनी मोर्चात सहभागी झालेल्यांना मुस्लीम आणि ख्रिश्चन समुदायातील व्यावसायिकांवर आर्थिक बहिष्कार टाकण्याची शपथ दिली. विशेष म्हणजे यावेळी भाजपाचे माजी खासदार उपस्थित असल्यानं काँग्रेसकडून टीका करण्यात येत आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्र्यांचं पोस्टर फाडल्याने कुत्र्याविरोधात पोलीस तक्रार, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?
दरम्यान, भाजपाचे नेते रूपसिंग मांडवी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. “बेमेतरा भागात हिंसाचार झाला. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने ‘छत्तीसगड बंद’ची हाक दिली होती. त्याला भाजपाने पाठिंबा दिला होता. मात्र, शपथविधीबाबत आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती. या शपथविधाचा भाजपाशी काहीही संबंध नाही”, असे ते म्हणाले.
हेही वाचा – देशभरातील मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठण करू द्या, पुण्यातील दाम्पत्याची मागणी
यासंदर्भात बोलताना, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले, “बेमेतरा भागात झालेल्या दोन मुलांच्या भांडणात एकाचा मृत्यू झाला. ही घटना दुर्दैवी आहे. मात्र, या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातो आहे. विरोधकांकडून केवळ राजकारण सुरू आहे”