विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) वतीने शनिवारी येथे संकल्प दिवस मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याने त्याच्या पूर्वसंध्येवर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून राज्य सरकारने भाजप आणि विहिंपच्या नेत्यांची मोठय़ा प्रमाणावर धरपकड सुरू केली आहे. भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ आणि विहिंपच्या अनेक नेत्यांसह जवळपास १६०० जणांना अटक करण्यात आली आहे.
या धरपकड सत्राबरेबरच राज्य सरकारने अयोध्या आणि फैजाबादच्या सीमाही सील केल्या आहेत, असे पोलीस महानिरीक्षक (कायदा-सुव्यवस्था) आर. के. विश्वकर्मा यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून योगी आदित्यनाथ आणि त्यांच्यासमवेत असलेल्या २४ जणांना गोंडा रेल्वे स्थानकातच अटक करण्यात आली. आदित्यनाथ, भाजपचे खासदार अत्यदेव सिंग, पक्षाचे प्रादेशिक सचिव सूर्यनारायण तिवारी यांना अटक करून पाटबंधारे खात्याच्या वसतिगृहात ठेवण्यात आले आहे. विहिंपचे राष्ट्रीय सरचिटणीस चंपत राय, भाजपचे आमदार रामचंद्र यादव यांच्यासह २०० कार्यकर्त्यांना अयोध्येतील रामसेवकपूरम येथे अटक करण्यात आली आहे.
अलीकडेच मुझफ्फरपूर येथे जातीय दंगलीचा उद्रेक झाला होता त्या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारने उत्तर प्रदेश सरकारला अयोध्येत जैसे थे स्थिती ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे राज्यात अन्यत्र कोठेही जातीय दंगलींचा उद्रेक होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
या मेळाव्याच्या पूर्वसंध्येवर उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी ३४० जणांना अटक केली असून त्यामध्ये भाजपचे माजी आमदार लालूसिंग यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे अन्य ४२ जणांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. या मेळाव्याला जाण्यापासून विहिंपच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी शरयू पूल, फैजाबाद आणि अयोध्येत तीनपदरी नाकेबंदी करण्यात आली आहे. शीघ्र कृती दल आणि अन्य दलांचे २००० जवान तैनात करण्यात आले आहेत.
विहिंपच्या मेळाव्याच्या पूर्वसंध्येस भाजप खासदारासह १६०० जणांना अटक
विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) वतीने शनिवारी येथे संकल्प दिवस मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याने त्याच्या पूर्वसंध्येवर खबरदारीच्या उपाययोजना
First published on: 19-10-2013 at 12:29 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vhp sankalp diwas rally 1600 including bjp mp yogi adityanath arrested