देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महापुरुष आणि योगपुरूष अशी तुलना केली आहे. सोमवारी जैन तत्वज्ञानी श्रीमद राजचंद्र यांना समर्पित कार्यक्रमात जगदीप धनखड बोलत होते.

ते म्हणाले की, “मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, गेल्या शतकातील महापुरुष महात्मा गांधी होते. नरेंद्र मोदी हे या शतकातील युगपुरुष आहेत. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेने आपल्याला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त केले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला प्रगतीच्या मार्गावर नेले आहे.” ते पुढे म्हणाले की, या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे. या दोघांच्या आचरणात श्रीमद राजचंद्र यांची शिकवण आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव करताना त्यांनी इंडिया आघाडीवरही टीका केली. ते म्हणाले की, “या देशाच्या विकासाला विरोध करणाऱ्या शक्ती, या देशाचा उदय पचवू न शकणाऱ्या शक्ती एकत्र येत आहेत.”

उपराष्ट्रपतींच्या विधानावर काँग्रेस नेते मणिकम टागोर यांनी टीका केली. महात्मा गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केलेल्या तुलनेला त्यांनी लज्जास्पद म्हटलं आहे. X वरील एका पोस्टमध्ये मणिकम टागोर यांनी लिहिले की, “तुम्ही महात्मा गांधीशी तुलना केली हे लाजिरवाणे आहे. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते आणि तुम्ही ती मर्यादा ओलांडली आहे. तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदावर अशी विधाने तुम्हाला शोभत नाहीत.”

देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी श्रीमद राजचंद्रजींच्या भित्तीचित्राचे दिल्लीत अनावरण केले. या कार्यक्रमात ते बोलत होते.