US Vice President JD Vance on Green Card Holders : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा सत्तेत येताच अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. नुकतीच त्यांनी नवीन ‘गोल्ड कार्ड’ योजना जाहीर केली आहे. श्रीमंत गुंतवणूकदारांना पाच दशलक्ष डॉलर्समध्ये (जवळपास ४३ कोटी) निवासी परवाना देऊ करणाऱ्या या योजनेमुळे ग्रीन कार्डची वाट पाहात असलेल्या भारतीयांमध्ये व अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या अनेक छोट्या देशांच्या नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. सध्याच्या EB-5 या इमिग्रंट इन्व्हेस्टर प्रोग्राममध्ये बदल करणे आणि श्रीमंत व्यक्तींना अमेरिकेच्या नागरिकत्वाचा नवीन मार्ग खुला करणे हे या योजनेचं प्रमुख उद्दीष्ट आहे.
दरम्यान, अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांनी ग्रीन कार्डधारकांच्या अधिकारांबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ते म्हणाले, “ग्रीन कार्डधारक असल्यामुळे कोणत्याही व्यक्तीला अमेरिकेत राहण्याचा अधिकार अनिश्चित काळासाठी मिळत नाही. माझ्या पत्नीकडे (उषा व्हॅन्स) देखील ग्रीन कार्ड आहे. म्हणून तिला हा अधिकार मिळत नाही. हे प्रत्येक अभिव्यक्तीबद्दल नसलं तरी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेबद्दल आहे. अमेरिकन नागरिक म्हणून आपल्या राष्ट्रीय समुदायात कोणाचा समावेश व्हावा आणि कोणाचा होऊ नये हे ठरवणे महत्त्वाचे आहे.”
अमेरिकेचे उपाध्यक्ष नेमकं काय म्हणाले?
जे. डी. व्हॅन्स म्हणाले, “युनायटेड स्टेटस कायद्यात काही विशिष्ट परिस्थितींचा उल्लेख आहे ज्यामध्ये ग्रीन कार्ड देखील रद्द केलं जाऊ शकतं. गुन्हेगार किंवा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेली व्यक्ती, देशात दीर्घकाळ उपस्थित नसणे, इमिग्रेशन नियमांचे योग्य पालन न करणे अशा काही बाबींचा या नियमांमध्ये समावेश आहे.”
अमेरिकेत कायमस्वरुपी निवासी म्हणून जे दस्तावेज लागतात त्यापैकी प्रमुख म्हणजे ग्रीन कार्ड. या ग्रीन कार्डद्वारे परदेशी नागरिकांना अमेरिकेत राहण्याचा व काम करण्याचा अधिकार मिळतो. या ग्रीन कार्डद्वारे परदेशी नागरिकांना कायमस्वरुपी निवासी होता येतं. परंतु, त्याची हमी देता येत नाही. म्हणजेच अनिश्चित काळासाठी अमेरिकेत राहता येईल की नाही याची हमी देता येत नाही.”
व्हॅन्स यांच्या पत्नी भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत
व्हॅन्स यांच्या पत्नी उषा या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत. ८० च्या दशकात त्यांचं कुटुंब आंध्र प्रदेशमधून अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील सॅन डियागो शहरात स्थलांतरित झालं. उषा यांचा जन्म देखील कॅलिफोर्नियातच झाला. त्यांचे वडील इंजिनियर तर आई बायोलॉजिस्ट होत्या. त्यांचं शिक्षण अमेरिकेतच झालं असून नंतर त्यांनी तिथेच नोकरी करणं पसंत केलं. २०१३ मध्ये त्यांनी येल लॉ स्कूल येथून वकिलीत डॉक्टरेट मिळवली. व्हॅन्स आणि उषा यांची पहिली भेट याच लॉ कॉलेजमध्ये झाली होती. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी २०१४ मध्ये लग्न केलं. व्हॅन्स दाम्पत्याला एकूण तीन अपत्ये आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd