जाहिरात ही सध्या आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. विविध पदार्थांच्या, वस्तूंच्या जाहिराती केल्या जातात. ग्राहकांना वस्तू, पदार्थ किंवा उत्पादनाची माहिती व्हावी हा त्यामागचा मूळ उद्देश असतो. मात्र जाहिरातींमुळे फसवणुकीचेही प्रकार घडतात. फसवणूक झालेल्यांच्या यादीत सामान्य माणसेच नाहीत तर आता उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूही आहेत.
राज्यसभेत व्यंकय्या नायडू यांनी त्यांना आलेला अनुभव सांगितला. नायडू म्हणातात, ‘काही दिवसांपूर्वी मी टीव्हीवर वजन कमी करण्याच्या प्रॉडक्टची एक जाहिरात पाहिली. या जाहिरातीत असा दावा करण्यात आला होता की गोळ्या घेऊन एका विशिष्ट कालावधीत वजन कमी करण्यास मदत होते. ही जाहिरात पाहून मी या गोळ्या मागवल्या त्यासाठी १ हजार रुपयेही भरले. मात्र या गोळ्या मला पाठवण्यात आल्याच नाहीत.’
‘गोळ्या येण्याऐवजी त्याजागी फक्त एक इमेल आला ज्यामध्ये लिहिण्यात आले होते की वजन कमी करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या प्रकारच्या गोळ्या घ्यायच्या आहेत ज्यासाठी तुम्हाला आणखी एक हजार रूपये भरावे लागतील. या गोळ्यांचे पैसे भरल्याशिवाय तुम्हाला त्या पाठवल्या जाणार नाहीत. या सगळ्या अनुभवामुळे मी समजून चुकलो की मी पाहिलेल्या जाहिरातीला काहीही अर्थ नव्हता. ती तद्दन खोटी जाहिरात होती असेही नायडू यांनी राज्यसभेत सांगितले.’ ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
मला आलेल्या इमेलबाबत आणि या सगळ्या घटनेबाबत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना मी माझा अनुभव सांगितला. त्यांनी यासाठी चौकशी समिती नेमली, चौकशीत समजले की माझी फसवणूक झाली आहे. त्याचवेळी मी पासवान यांना सांगितले की अशा खोट्या जाहिराती देणाऱ्यांविरोधात कठोर कायदे करा जेणेकरून सामान्य माणसाची फसवणूक होता कामा नये.
वजन कमी करण्यासाठीचे आयुर्वेदिक औषध, गोळ्या किंवा तत्सम प्रॉडक्ट विकणाऱ्या कितीतरी जाहिराती आपण टीव्हीवर पाहतो किंवा वर्तमानपत्रात वाचतो. मात्र या जाहिराती फसव्या असतात असेच अनुभव अनेकदा ग्राहकांना येतात. अशा जाहिरातींना न भुलता जागरुक राहणे आवश्यक आहे कारण या जाहिरातबाजीमुळे दस्तुरखुद्द उपराष्ट्रपतींचीही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.