काँग्रेसप्रणीत यूपीएचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांचा पराभव करत भाजपचे व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती विराजमान झाले. ११ ऑगस्टरोजी नायडू उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नायडू यांनी ऐतिहासिक मताधिक्याने विजय मिळवला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ते उपराष्ट्रपतीपदापर्यंतचा नायडूंचा हा प्रवास तितकाच रोमहर्षक आहे.
शेतकऱ्याच्या घरी जन्म
व्यंकय्या नायडू यांचा जन्म १ जुलै १९४० रोजी आंध्रप्रदेशमधील नेल्लोर येथे झाला. रंगैया नायडू हे त्यांचे वडील होते. त्यांचे वडील रंकैया नायडू हे शेतकरी होते. नायडू यांनी नेल्लोरमधील महाविद्यालयातून पदवी घेतली. यानंतर विशाखापट्टणममधील आंध्र विद्यापीठातून त्यांनी एलएलबी पूर्ण केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकारणात प्रवेश
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच नायडू राजकारणाकडे वळले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) नेल्लोरमधील व्ही आर महाविद्यालयाचे ते अध्यक्ष होते. यानंतर ते भाजपमध्ये सक्रीय झाले. १९७२ च्या ‘जय आंध्र’ आंदोलनातून त्यांना नेता म्हणून ओळख मिळाली. १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात ते तुरुंगातही गेले होते. भाजपसाठी भिंतीवर घोषणा लिहीण्याचे कामही त्यांनी केले.
आंध्र प्रदेशमध्ये दोन वेळा आमदार
आंध्र प्रदेशमध्ये १९७८ ते ८३ आणि १९८३ ते ८५ या कालावधीत नायडू आमदार म्हणून विधीमंडळात निवडून आले.
पक्षात महत्त्वाच्या पदावर संधी
आंध्र प्रदेशमधील राजकारणानंतर नायडू यांना दिल्ली खूणावत होती. भाजपनेही निष्ठावंत नायडूंना संधी दिली. १९९३ ते २००० या कालावधीत नायडू भाजपचे महासचिव होते. २००२ ते २००४ या कालावधीत ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.
चार वेळा खासदार
व्यंकय्या नायडू हे चार वेळा राज्यसभेचे खासदार राहिले. १९९८ मध्ये पहिल्यांदा त्यांची कर्नाटकातून राज्यसभेवर निवड झाली. २००४ ते २०१० मध्येही त्यांना कर्नाटकातूनच राज्यसभेवर पाठवण्यात आलं. २०१६ मध्ये राजस्थानमधून राज्यसभेवर पाठवण्यात आले.
वाजपेयी आणि मोदींच्या मंत्रिमंडळात संधी
संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव असलेले नायडू हे अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी या दोघांच्या मंत्रिमंडळात होते. २००० ते २००२ या कालावधीत वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात नायडूंकडे ग्रामविकास खाते सोपवण्यात आले होते. तर मोदींच्या मंत्रिमंडळात २०१४ ते २०१७ या कालावधीत ते संसदीय कामकाज मंत्री होते. तसेच केंद्रीय नगरविकास मंत्री म्हणून त्यांनी काम केले. संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचा त्यांचा १९ वर्षांचा अनुभव आहे.
हिंदीवर प्रभुत्व
नायडू हे दक्षिण भारतीय असूनही त्यांनी हिंदी शिकण्यासाठी मेहनत घेतली. उत्तर भारतातील निवडणूक प्रचारसभांमध्ये त्यांचे मतदारांना भावले होते. नायडू यांचे दक्षिणेतील राज्यांमधील प्रादेशिक पक्षांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे नायडू यांची भाजपला नेहमीच मदत झाली आहे.
आंध्रप्रदेशचे तिसरे उपराष्ट्रपती
आंध्रप्रदेशमधून निवडून गेलेले व्यंकय्या नायडू हे तिसरे उपराष्ट्रपती आहेत. यापूर्वी सर्वपल्ली राधाकृष्णन आणि व्ही.व्ही गिरी हे दोघेही उपराष्ट्रपती झाले होते. यानंतर दोघेही राष्ट्रपती विराजमान झाले होते.