वर्क लाईफ बॅलन्स यावर जगभर चर्चा सुरू असताना भारतात आता एका सरकारी कर्मचाऱ्याने कामाच्या दडपणाखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. ही आत्महत्या म्हणजे व्यवस्थेचा बळी असल्याची प्रतिक्रिया पीडित कर्मचाऱ्याच्या पत्नीने दिली. जीएसटी विभागात उपायुक्त असलेले ५९ संजय सिंग यांनी काल (१० मार्च) १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ते कर्करोगाविरोधातही झुंज देत होते. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

कर्करोग जीवघेणा नव्हता

संजय सिंग यांच्या पत्नीने माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं, संजय सिंग योद्धा होते. त्यांचा कर्करोग जीवघेणा नव्हता. माझे सासरे आणि नणंद त्यांच्यावर उपचार करत होते. त्यांचा कर्करोग जीवघेणा कधीच नव्हता. पण कामाच्या ठिकाणी त्यांच्यावर खूप दबाव होता. कदाचित त्यांच्या विभागातील सहकाऱ्यांना हे चांगले माहीतअसेल.”

जीएसटी अधिकाऱ्याची आत्महत्या

५९ वर्षीय संजय सिंह हे गाझियाबादमधील जीएसटी विभागात उपायुक्त होते. त्यांनी काल सकाळी ११ वाजता नोएडाच्या सेक्टर ७५ मधील अ‍ॅपेक्स अथेना या निवासी संकुलातील १४ व्या मजल्यावरील फ्लॅटवरून उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्या त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांचा मोठा मुलगा गुरुग्राममध्ये काम करतो आणि धाकटा मुलगा शारदा विद्यापीठात दंतचिकित्साचा विद्यार्थी आहे.

जे काही घडलं त्याला यंत्रणा जबाबदार

“आम्हाला अशा कोणत्याही गोष्टीची भीती वाटली नाही. हे सामान्य नाही. तो व्यवस्थेचा बळी ठरला. जर कोणी या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत असेल तर ते माझ्याशी बोलू शकतात”, असंही सिंग यांच्या पत्नी म्हणाल्या. सिंग यांनी त्यांच्या पतीचा प्रोस्टेट कर्करोग शेवटच्या टप्प्यात पोहोचल्याच्या वृत्तांनाही खोडून काढले. “देव त्यांना माफ करो. मी सर्वांना गप्प करू शकत नाही. माझे पती चौथ्या टप्प्यातील कर्करोगाचे रुग्ण नव्हते आणि माझ्याकडे याचे पुरावे आहेत. जे काही घडले आहे, त्यासाठी यंत्रणा जबाबदार आहे. याची चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणीही त्यांनी केली.

वृत्तानुसार, संजय सिंह हे गाझियाबादच्या राजेंद्र नगर येथील जीएसटी कार्यालयात कार्यरत होते आणि ते सर्वोच्च न्यायालयातील खटले हाताळत होते. उत्तर प्रदेशातील कर अधिकाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या एका संघटनेने त्यांच्या सदस्यांना संजय सिंह यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ काळ्या पट्ट्या बांधण्याचे आवाहन केले आहे.

सरकारी कार्यालयात कामाचा अतिताण

एका निवेदनात, उत्तर प्रदेश राज्य कार अधिकारी सेवा संघाने प्रशासनावर “दुराचारीपणा” केल्याचा आरोप केला आहे आणि कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी काम करण्यास आणि वेळेवर न भरलेली प्रकरणे अंतिम मुदतीपूर्वी पूर्ण करण्यास सांगितले जात असल्याचा आरोप केला आहे. कर्मचारी संघटनेने असाही आरोप केला आहे की त्यांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या आहेत. “कामाच्या ताणामुळे चुका होण्याची भीती असल्याने अधिकाऱ्यांमध्ये निराशा आहे,”, असे त्यात म्हटले आहे.