नोएडा येथे २०२४ सप्टेंबर महिन्यात झालेल्या बलात्कार प्रकरणात संबंधित पीडिताच जबाबदार असल्याचं सांगत अलाहाबाद उच्च न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला आहे. महिलेने स्वतःहूनच संकटाला आमंत्रण दिले होते, अशी टिप्पणी न्यायमूर्ती संजय कुमार यांनी सुनावणीवेळी केली. बार अँन्ड बेंचने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना सप्टेंबर २०२४ मध्ये घडली. नोएडा येथील एका लोकप्रिय विद्यापीठाची विद्यार्थिनी तिच्या तीन मैत्रिणींसह दिल्लीतील हौज खास येथील एका बारमध्ये गेली होती. तिथे तिला काही ओळखीचे मित्र भेटले. नोएडा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पीडितेने म्हटले आहे की, मी दारूच्या नशेत होते. त्यामुळे आरोपी माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. पहाटे ३ वाजेपर्यंत आम्ही बारमध्ये होतो. तो त्याच्याबरोबर येण्यास सांगत होता.”
“त्याच्या आग्रहास्तव मी त्याच्या घरी आराम करण्यासाठी जाण्यास तयार झाले. घरी पोहोचेपर्यंत तो मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत राहिला. तसंच, त्याच्या नोएडा येथील घरी घेऊन जाण्याऐवजी त्याने मला त्याच्या गुडगाव येथील एका नातेवाईकाच्या घरी नेलं. तिथेच त्याने माझ्यावर बलात्कार केला”, असंही पीडितेने तक्रारीत म्हटल्याचं पोलिसांनी सांगितलं.
आरोपीचा जबाब काय?
घटना घडल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली आणि नोएडा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. या एफआयआरनुसार ११ डिसेंबर २०२४ रोजी आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीने आपल्या जामीन अर्जात न्यायालयाला सांगितले की, “पीडितेला आरामाची गरज होती, त्यामुळे ती स्वतःच माझ्या घरी जाऊन आराम करण्यास तयार झाली. नातेवाईकच्या फ्लॅटवर घेऊन जात आमच्यात दोनवेळा लैंगिक संबंध झाले. पण हा बलात्कार म्हणता येणार नाही. कारण आमच्या सहसंमतीने हे संबंध झाले होते.”
न्यायालयाने मत काय?
“या प्रकरणी न्यायालयाचे असे मत आहे की जरी पीडितेचा आरोप खरा मानला गेला तरी, तिने स्वतःच या संकटाला आमंत्रण दिले आणि त्यासाठी ती जबाबदार होती असा निष्कर्ष काढता येतो. पीडितेने तिच्या जबाबातही अशीच भूमिका घेतली आहे. तिच्या वैद्यकीय तपासणीत तिचे हायमेन फाटलेले आढळले, परंतु डॉक्टरांनी लैंगिक अत्याचाराबद्दल कोणतेही मत दिले नाही “, असं न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाने म्हटले की, “पीडिता पदव्युत्तर वर्षाची विद्यार्थिनी आहे आणि त्यामुळे तिने केलेले कृत्य समजून घेण्यास ती सक्षम होती. प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थिती लक्षात घेता तसेच गुन्ह्याचे स्वरूप, पुरावे, आरोपीची सहभाग आणि पक्षकारांच्या वकिलांचे म्हणणे लक्षात घेता, अर्जदाराने जामिनासाठी योग्य केस तयार केली आहे असे माझे मत आहे. म्हणून, जामीन अर्ज मंजूर करण्यात येत आहे”, असे आदेश न्यायालयाने दिले.