पीटीआय, नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बदनामी प्रकरणात शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी, ‘‘सत्याचा नेहमीच विजय होतो, हा घटनात्मक तत्त्वांचा विजय आहे,’’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली, त्याचबरोबर पाठिंब्याबद्दल लोकांना धन्यवाद दिले.
सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे काँग्रेस मुख्यालयात जोरदार स्वागत केले. यावेळी त्याच्याबरोबर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेही उपस्थित होते. काँग्रेस मुख्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल म्हणाले की, एक ना एक दिवस हे घडणार होते. कारण सत्याचा नेहमीच विजय होतो.
मी निवडलेला मार्ग, माझे कार्य याविषयी माझ्या मनात स्पष्टता आहे. ज्या लोकांनी मला मदत केली, माझ्याबद्दल प्रेम व्यक्त केले, मला पाठिंबा दिला, त्यांचे मी आभार मानतो, असे राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत सांगितले. आज नाही, तर उद्या किंवा परवा..पण सत्याचा विजय होतोच, असे ते म्हणाले.
संविधान जिवंत आहे आणि न्याय मिळू शकतो, त्याचे हे उदाहरण आहे. हा सामान्य नागरिकांचा आणि घटनात्मक मूल्यांचा विजय आहे. – राहुल गांधी, काँग्रेस नेते