स्वतंत्र तेलंगण राज्याच्या निर्मितीच्या घोषणेनंतर ऐरणीवर आलेल्या वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सोमवारी, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जंतरमंतर येथे विदर्भ संयुक्त कृती समिती एक दिवसाचे सांकेतिक आंदोलन करणार आहे. आज समितीच्या वतीने येथे ही घोषणा करण्यात आली.
महाराष्ट्रात सामील झाल्यानंतर गेल्या ५३ वर्षांत विदर्भावर सातत्याने अन्याय होत असून, ७५ हजार कोटींचा अनुशेष निर्माण झाल्याचा दावा संयुक्त कृती समितीचे मुख्य समन्वयक माजी आमदार वामनराव चटप यांनी केला. सोमवारी सकाळी ११ ते ५ दरम्यान होणाऱ्या धरणे आंदोलनानंतर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी पुढची रणनीती ठरविण्यात येईल, असे ते म्हणाले. भाषा हा राज्यांच्या निर्मितीचा एकमेव निकष होऊ शकत नाही. दोन तेलुगू भाषिक राज्ये होणार असतील तर दोन मराठीभाषिक राज्ये का होऊ नये, असा सवाल अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केला. विदर्भाचा अनुशेष दूर झाला नाही तर वेगळ्या विदर्भाच्या मागणीचे आपण नेतृत्व करू, असे १९९६ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते, यावर शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी विचार करावा, असे माजी पोलीस उपमहानिरीक्षक प्रबीर चक्रवर्ती म्हणाले.
नव राज्य निर्माण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामकिशन तोमर यांनीआयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ठाकूर किशोरसिंह बैस, दीपक निलावार आणि अन्य विदर्भ समर्थक उपस्थित होते. दिल्लीतील मुक्कामादरम्यान विदर्भ संयुक्त कृती समितीचे नेते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह, बसपच्या अध्यक्ष मायावती, हरित प्रदेशचे समर्थक केंद्रीयमंत्री अजित सिंह यांच्या भेटीसाठी प्रयत्नशील आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा