Indonesia Jakarta Mosque Fire: इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये बुधवारी (१९ ऑक्टोबर) इस्लामिक सेंटर मशिदीला भीषण आग लागली. या आगीनंतर मशिदीवरील भव्य घुमटही कोसळला आहे. उत्तरी जकार्तामध्ये असलेल्या जामी मशिदीच्या (Jami Mosque) घुमटाला ही आग लागली होती.

स्‍थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या मशिदीच्या घुमटाचं काम सुरू असतानाच आग लागली. यानंतर ही आग प्रचंड वेगाने परिसरात पसरली आणि काही वेळेतच हा घुमट जमीनदोस्त झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणीही जखमी नाही. सध्या आगीच्या कारणांचा तपास केला जात आहे. या प्रकरणी मशिदीच्या घुमटाचं काम करणाऱ्या कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

जकार्तामधील मशिदीचा घुमट कोसळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत घुमटाच्या एका बाजूला आग लागल्याचं दिसत आहे. यावेळी नुतनीकरणाचं काम करणारे अनेक कर्मचारी आग विझवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, हवेचा वेग अधिक असल्याने ही आग कमी वेळेत संपूर्ण घुमटात पसरली. त्यानंतर धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा पाहायला मिळाल्या. तसेच काही क्षणात पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे मशिदीचा भव्य घुमट जमीनदोस्त झाला.

इंडोनेशियातील माध्यमांनी सांगितलं की, स्थानिक वेळेनुसार दुपारी तीन वाजल्यानंतर अग्निशामक दलाला आगीची माहिती मिळाली. यानंतर जवळपास १० अग्निशमन गाड्या घटनास्थळावर पाठवण्यात आल्या.

हेही वाचा : VIDEO: इराणच्या जेलमध्ये मोठी आग, गोळीबाराच्या आवाजानं परिसर दणाणला, हिजाबविरोधी आंदोलनाशी संबंध?

या प्रकरणी इमारतीत काम करणाऱ्या ठेकेदारांची चौकशीही केली जात आहे. मात्र, अद्याप मशिदीला आग कशी लागली याबाबत अधिकृत कारणं सांगण्यात आलेले नाहीत. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, घुमटाच्या नुतनीकरणाचं काम सुरू होतं. याचवेळी आग लागली. पोलीस आगीच्या कारणांचा तपास करत आहे. या इस्लामिक सेंटर परिसरात मशिदीशिवाय शैक्षणिक, व्यापारी आणि संशोधन सुविधादेखील आहेत.

Story img Loader