छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांचा आकडा 4 वर पोहोचला आहे. नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) दोन कर्मचारी शहीद झाले तर दूरदर्शनच्या एका कॅमेरामनचा मृत्यू झाला. यावेळी दूरदर्शनचा कॅमेरा असिस्टंट या हल्ल्यातून सुदैवाने बचावला. याच हल्ल्यातून वाचलेल्या एका कॅमेरामनचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. व्हिडीओत असिस्टंट कॅमेरामन मोरमुकूट खाली जमिनीवर झोपून आपला जीव वाचवताना दिसत आहे. अशा परिस्थितीतही ते आपलं आईवरील प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.

मोरमुकूट यांना जवानांनी वाचवलं आणि सुखरुप सुटका केली. मोरमुकूट यांच्यासोबत रिपोर्टर धीरज कुमार आणि कॅमेरामन अच्युतानंद साहू होते. बस्तर येथे निवडणूक कव्हर करण्यासाठी ते आले होते. हे सर्वजण जवानांसोबत नक्षलग्रस्त विभागातून जात होते, त्यावेळी त्यांच्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला.

एकीकडे जवान नक्षलवाद्यांना लढा देत असताना मोरमुकूट आणि अच्युतानंद साहू यांनी आपली जबाबदारी पार पाडत कॅमेऱ्यात सर्व रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न सुरु केला. यावेळी झाडाच्या मागे उभ्या असणाऱ्या अच्युतानंद साहू यांना गोळी लागली आणि ते खाली कोसळले. यानंतर मोरमुकूटदेखील जीव वाचवण्यासाठी खाली जमिनीवर झोपले.

‘आई माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे’, कॅमेरामनने रेकॉर्ड करुन ठेवला होता मेसेज

मृत्यू समोर असल्याचं दिसताच मोरमुकूट यांनी व्हिडीओ शूट करत आपल्या आईसाठी मेसेज दिला. माझं तुझ्यावर खूप प्रेम असल्याचं सांगताना ते दिसत आहे. कदाचित या हल्ल्यात मी मारला जाईन अशी भीती ते व्यक्त करताना दिसत आहेत. मात्र नंतर त्यांना वाचवण्यात यश आलं.

एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मोरमुकूट शर्मा यांनी सांगितलं की, ‘रस्ता खराब असल्या कारणाने आम्हाला दुचाकीवरुन जावं लागलं. नक्षलवादी त्याचीच वाट पाहत होते. जवान दुचाकीवरुन येताना दिसताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला’. पुढे त्यांनी सांगितलं की, एक जवान 10 मीटर अंतरावर जखमी अवस्थेत पडला होता. गोळी लागल्यानंतरही जवान अजिबात आवाज न करता तिथे पडून होता. तेथून 20 मिनिटांच्या अंतरावर कॅमेरामन शाहू होते. डोकं थोडं जरी वर केलं असतं तर गोळी लागण्याची भीती होती. माझ्या कानाजवळूनही गोळ्या जात होत्या’.

Story img Loader