छत्तीसगडमध्ये झालेल्या धर्मसंसदेवरून गदारोळ अजूनही सुरूच आहे. कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता कालीचरण यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. व्हिडीओमध्ये कालीचरण यांनी गांधींना शिव्या दिल्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचे म्हटले आहे. उलट कालीचरण यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपिता महात्मा गांधींवर आरोप केले आहेत. सरदार पटेलांऐवजी नेहरू पंतप्रधान झाल्याबद्दलही त्यांनी सवाल केला आहे. तर महात्मा गांधींना राष्ट्रपिता नव्हे तर घराणेशाहीचे जनक म्हटले आहे.
स्वतःला कालीपुत्र म्हणणाऱ्या कालीचरण महाराज यांनी रायपूर धर्म संसदेत महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरले होते. या संदर्भात, २६ डिसेंबरच्या रात्री, काँग्रेसने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे आणि टिकरापारा पोलीस ठाण्यात कालीचरण यांच्याविरुद्ध कलम २९४ आणि ५०५ (२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. यानंतर, २७ डिसेंबर रोजी रात्री उशिरा कालीचरण यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर आठ मिनिटे ५१ सेकंदांचा व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल दिलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
“गांधींना शिवीगाळ केल्याप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबद्दल मला कोणताही पश्चाताप नाही. देशाच्या पंतप्रधानपदासाठी सरदार पटेल यांना मते मिळाली होती आणि एकही मत नेहरूंना नव्हते, तरीही नेहरूंना पंतप्रधान का केले,” असे कालीचरण महाराज म्हणाले.
“घराणेशाहीची मुळे पसरवणाऱ्या गांधींनी काँग्रेसच्या इतरांना निराश केले. सरदार पटेल यांच्याकडे पंतप्रधानपद असते तर भारत सोन्याचा पक्षी झाला असता आणि भारत जगतगुरू झाला असता. भारत अमेरिकेपेक्षा मोठी शक्ती बनला असता. गांधींनी हा विश्वासघात केला, त्यामुळे माझ्या मनात गांधींबद्दल तिरस्कार आहे. गांधी हे घराणेशाहीचे जनक आहेत, राष्ट्रपिता नाहीत,” असे वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले आहे.
“स्वातंत्र्य लढ्यात फाशी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी 80 टक्के शिख लोक आहेत. गांधींनी काठीही खाल्ली नाही. सुखदेव, राजगुरू आणि भगतसिंग यांची फाशी ते थांबवू शकले असते. पण त्यांनी थांबवले नाही म्हणून मी गांधींचा तिरस्कार करतो,” असे कालीचरण म्हणाले.
“गांधींचे सर्वात मोठे शस्त्र उपोषण हे होते, पण त्यांनी ते केवळ हिंदूंच्या विरोधात वापरले. फाळणी झाली तेव्हा गांधी हयात होते. त्या हिंसाचारात लाखो कोटी हिंदू मारले गेले, एकाच दिवसात २७ लाख लोक मारले गेले. इकडे गांधी पाकिस्तानला ५५ कोटी मिळावेत म्हणून उपोषण करत होते,” असेही कालीचरण म्हणाले.
आता पाकिस्ताननेही भारताला सुनावलं; धर्म संसदेतल्या भाषणांवरून भारतीय अधिकाऱ्याकडे व्यक्त केली चिंता
“मी गांधींचा द्वेष करतो. दोनशे वर्षांपूर्वी आलेला माणूस राष्ट्रपिता कसा होऊ शकतो? राष्ट्रपिता बनवायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना बनवले पाहिजे. गोविंदसिंग महाराज महाराणा प्रतापजी महाराज यांना राष्ट्रपती करावे. आचार्य चाणक्य यांना बनवावे. आत्ताचे महापुरुष बनवायचे असतील तर सरदार वल्लभभाई पटेल बनवले पाहिजेत,” असेही कालीचरण महाराज म्हणाले.