देशात लोकसभेच्या निवडणुका लागल्या असून अनेक पक्ष जागावाटप जाहीर करत आहेत. यंदाची निवडणूक ही इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी रंगणार आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपासाठी चुरस आहे. तर अनेक मित्रपक्षही जागेसाठी आग्रही असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, यंदाची लोकसभा निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही लढवणार आहेत. त्यामुळे मनसे यंदा एकट्याने ही निवडणूक लढतेय की कोणाच्या पाठिंब्याने हे पाहावं लागणार आहे. परंतु, या सर्व गदारोळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत.
गेल्या काही दिवसांत राज ठाकरेंच्या दिल्लीत दौऱ्यांत वाढ झाली आहे. ते दिल्लीत अमित शाह यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे. मनसेकडून महाराष्ट्रात दोन जागांची मागणी करण्यात येऊ शकते. याच मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ॉ
२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुका मनसे लढली नव्हती. परंतु, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दर्शवला होता. मात्र, गेल्या काही दोन वर्षांत राज्यात झालेल्या उलथापालथीमुळे राज ठाकरेंनी यंदाची लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. यासाठी त्यांनी मतदारसंघांची चाचपणीही सुरू केली आहे. दरम्यान, दक्षिण मुंबई मतदारसंघाची जागा त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याची चिन्हे आहेत, असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. या जागेसाठी मनसेकडून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसे राज्यातील सर्व मतदारसंघात उमेदवार उभे करणार की सध्याच्या आघाडी किंवा युतीला पाठिंबा देऊन त्यांच्यात सामील होणार हे अद्यापही निश्चित झालेलं नाही.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठका वाढल्या होत्या. या दोन्ही नेत्यांनी अनेकदा गुप्त बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे ते भाजपाला पाठिंबा देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुका लागल्यानंतर राज ठाकरे अधिक सक्रिय झाले असून त्यांनी दिल्लीवारी सुरू केली आहे. राज ठाकरे आता दिल्लीत दाखल झाले असून उद्या ते अमित शाहांसह अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे. या बैठकीत काय निर्णय होतोय, हे पाहावं लागेल.