पंतप्रधान मोदींच्या ‘चाय पे चर्चा’नंतर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ‘मोमो विथ ममता’ची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. पश्चिम बंगालमधील आपल्या नियोजित दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज (गुरुवार) ममता बॅनर्जी दार्जिलिंगमध्ये होत्या. या ठिकाणी त्या सकाळी फेरफटका मारायला जेव्हा बाहेर पडल्या तेव्हा त्यांनी एका मोमो स्टॉलला भेट दिली. एवढच नाहीतर त्यांनी स्वत: मोमो देखील तयार केले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या या कृतीमुळे सर्वजण आवाक झाले.
मोमो स्टॉलवर ममता बॅनर्जी मोमो बनवत असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून, लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या ”चाय पे चर्चा” नंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या ”मोमो विथ ममता”ने नव्या चर्चांना सुरुवात केली आहे.
थंडीपासून वाचण्यासाठी मोजे आणि शाल घालून बाहेर पडलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बचत गटांच्या महिला सदस्यांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी मोमोज बनवावेत, असा महिलांनी आग्रह केला होता. यानंतर ममता बॅनर्जी यांनी उत्साहाने मोमोज बनवून दाखवले.
या प्रसंगी ममता बॅनर्जींनी नागरिकांना सांगितले की, केवळ महिलांनीच बचत गट तयार करावेत असे नाही, तर पुरुषही असे गट तयार करून राज्य सरकारकडून लाभ मिळवू शकतात. “रोजगार वाढवण्यासाठी पुरुषांसोबतही स्वयं-सहायता गट तयार केले जातील,” असे त्यांनी म्हटले.