कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारला दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या अमानुष मारहाणीनंतर सागर धनखडचा मृत्यू झाला होता. यानंतर सुशील कुमार आपल्या साथीदारांसोबत फरार होता. अखेर पोलिसांनी त्याच्यासहित इतर आरोपींना अटक केली असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान सुशील कुमारने सागर धनखडवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

माजी कनिष्ठ राष्ट्रीय विजेत्या सागरला सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांनी सुमारे २५ मिनिटे मारहाण केली होती. पोलीस नियंत्रण कक्षात माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा ही मारहाण थांबवण्यात आली. सुशील कुमारने शहरातील कुस्ती क्षेत्रात आपली दहशत पसरवण्यासाठी हत्येचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

“सुशील कुमारने आपला मित्र प्रिन्सला व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सांगितलं होतं. सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पीडितांना जनावरांप्रमाणे मारहाण केली. त्याला कुस्ती क्षेत्रात आपली दहशत निर्माण करायची होती,” अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली होती.

नेमकं काय झालं होतं –
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सागर राणा आणि त्याच्या दोन मित्रांना ४ मे रोजी राजधानी दिल्लीतील छत्रसाल स्टेडिअममध्ये बेदम मारहाण केली होती. तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सागर राणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मालमत्तेवरील अतिक्रमण आणि ताबा सोडण्यासाठीची धमकी याचे पर्यवसान ४ मे रोजी मारहाणीत घडले आणि त्यात सागरची हत्या झाली, असे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.

सुशीलच्या चार साथीदारांना चार दिवसांची पोलीस कोठडी

घटनेनंतर फरार असलेल्या सुशील कुमारवर दिल्ली पोलिसांनी एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. याशिवाय अजय कुमारच्या अटकेसाठी ५० हजारांचं बक्षीस जाहीर झालं होतं. ३७ वर्षीय सुशील कुमारला अटक करण्यासाठी पोलिसांनी दिल्ली तसंच शेजारच्या अनेक राज्यांमध्ये छापे टाकले होते. १८ मे रोजी सुशील कुमारने दिल्ली कोर्टात धाव घेत अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली होती. तपास एकतर्फी असून पीडितला झालेल्या दुखापतीशी आपला संबंध नसल्याचा दावा त्याने केला होता. मात्र कोर्टाने प्रथमदर्शी मुख्य आरोपी असून गंभीर आरोप असल्याचं सांगत अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली होती. नंतर त्याला अटक करण्यात आली.

Story img Loader