Trump Vs Zelensky: व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या बाचाबाचीच्या बातम्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत असे दिसून येत आहे की, जेव्हा रशिया-युक्रेन युद्धाबाबत ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात जोरदार बाचाबाची सुरू होते, तेव्हा त्यावेळी ओव्हल ऑफिसमध्ये उपस्थित असलेल्या अमेरिकेतील युक्रेनियन राजदूत डोक्यावर हात ठेवून निराश झालेल्या दिसत होत्या. तसेच त्या त्यांचा चेहराही लपवताना दिसल्या.
व्हायरल व्हिडिओत काय आहे?
ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील बैठकीदरम्यान अमेरिकेतील युक्रेनियन राजदूत ओक्साना मार्कारोवा देखील उपस्थित होत्या. ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात बाचाबाची सुरू असताना, मीडियाचे कॅमेरे मार्कारोवा यांच्या प्रतिक्रियेकडे वळले. ही चर्चा पाहून मार्कारोवा खूपच तणावग्रस्त दिसत होत्या. तणावात, मार्कारोवा यांनी त्यांचे डोके किंचित वाकवले आणि कपाळ धरले. यावेळी त्या त्यांचा चेहराही लपवत असल्याचे दिसले.
नुकसान करून घेतले…
मार्कारोवा यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या प्रतिक्रियेवर युजर्स मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत. बरेच युजर्स म्हणत आहेत की, मार्कारोवा यांनादेखील माहित आहे की झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांच्याशी वाद घालून स्वतःचे नुकसान करून घेतले आहे.
व्हाईट हाऊसमध्ये काय घडलं?
शुक्रवारी अमेरिकन व्हाईट हाऊसमधील ओव्हल ऑफिसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात बैठक झाली. या बैठकीत अमेरिकेचे उप राष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यासह अमेरिकन मीडिया देखील उपस्थित होता. पण, ही बैठक नियोजना प्रमाणे झाली नाही. कारण यामध्ये ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. या बैठकीत व्हान्स यांनी ट्रम्प यांना पूर्ण पाठिंबा दिला.
यावेळ दोन्ही देशांमध्ये खनिज करारही होणार होता, जो या चर्चेदरम्यान झाला नाही. ट्रम्प यांनी युक्रेनला सुरक्षेची कोणतीही हमी दिली नाही. तसेच आता अमेरिकेकडून युक्रेनला कोणतीही मदत मिळणार नाही हे देखील स्पष्ट केले. यानंतर, झेलेन्स्की यांना ओव्हल ऑफिस सोडण्यास सांगण्यात आले आणि दोघांमधील संयुक्त पत्रकार परिषद देखील रद्द करण्यात आली. दरम्यान या वादाची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे.