सोशल मीडियावर सध्या पाकिस्तानी अधिकाऱ्याचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक पाकिस्तानी अधिकारी कुवेती शिष्टमंडळातील प्रतिनिधीचे पाकीट चोरताना दिसतोय. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार शुक्रवारी (दि. २८) आरोपी अधिकाऱ्याकडून कुवेती दिनारने भरलेले पाकीट जप्त केले आहे. कुवेती प्रतिनिधी हे पाकिस्तान-कुवेत संयुक्त मंत्रिस्तरीय मंडळाच्या दोन दिवसीय बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला आले होते.
Grade 20 GoP officer stealing a Kuwaiti official's wallet – the official was part of a visiting delegation which had come to meet the PM pic.twitter.com/axODYL3SaZ
— omar r quraishi (@omar_quraishi) September 28, 2018
माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, बैठकीत सहभागी झालेले कुवेतचे प्रतिनिधी जेव्हा हॉल बाहेर गेले. ते आपले पैशाने भरलेले पाकीट टेबलवरच विसरले होते. त्याचवेळी गुंतवणूक आणि सुविधाचे संयुक्त सचिव जर्रार हैदर खान तिथे आले. त्यांना कुवेती प्रतिनिधीचे पैशांचे पाकीट दिसले. त्यांनी ते लगेचच गूपचुप आपल्याकडे ठेवले. कुवेती प्रतिनिधीने पाकीट चोरीला गेल्याची तक्रार केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी सर्व सत्य समोर आले.
पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने भारतीय वृत्त वाहिनीला सांगितले की, बैठकीला आलेल्या उद्योग आणि अर्थ व्यवहार विभागाच्या अधिकाऱ्यांना जेव्हा हे प्रकरण माहीत झाले तेव्हा त्या सर्वांना याचा धक्का बसला. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. देशातील अधिकाऱ्यांसाठी ही अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, आरोपी जर्रार खानला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या कृत्यामुळे पाकिस्तानची मान आंतरराष्ट्रीय समुदायासमोर खाली गेली असून जगभरात हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.