भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज आसामच्या तेजपूर एअरफोर्स स्टेशनवरून सुखोई ३० या लढाऊ विमानाने आकाशात उत्तुंग भरारी घेतली. इतिहासात नोंद केली जावी असाच हा क्षण होता. राष्ट्रपती तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुख असतात. त्यांनी ३० मिनिटं भरारी घेतली त्यानंतर हिमालय आणि ब्रह्मपुत्र तसंच तेजपूर खोरं हे त्यांनी आकाशातून पाहिलं.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी ज्या सुखोई ३० या विमानातून भरारी घेतली ते विमान ग्रुप कॅप्टन नवीन कुमार यांनी चालवलं. ८०० किमी प्रतितास या वेगाने हे विमान चालवण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अशा प्रकारे सुखोईतून उत्तुंग भरारी घेणाऱ्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत.
उड्डाणानंतर काय म्हटलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी?
व्हिजिटर्स बुकमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी त्यांचा अभिप्राय लिहिला. “भारतीय वायू सेनेच्या सुखोई ३० या लढाऊ विमानातून उड्डाण करणं हा माझ्यासाठी एक अत्यंत उत्साह वाढवणारा अनुभव होता. मला अभिमा आहे की भारतात अशा प्रकारची लढाऊ विमानं आहेत. लष्कर, वायूदल आणि नौदल या तिन्ही दलांनी मोठा विस्तार केला आहे. भारतीय वायुसेना आणि तेजपूर वायूसेना स्टेशन यांच्या सगळ्या पथकाचे मी आभार मानते. अशा शब्दांमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उड्डाण करण्याच्या आधीपासून त्या उड्डाण करून परत येईपर्यंत ज्या ज्या सगळ्या गोष्टी घडल्या त्या सगळ्याची माहिती त्यांना आधी देण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी वायुसेनेच्या तयारीबाबत समाधान व्यक्त केलं तसंच आपल्यासाठी हा अनुभव खूप उत्साह वाढवणारा होता असंही त्यांनी म्हटलं आहे. मार्च २०२३ मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी INS विक्रांतचा दौरा केला होता. त्यावेळी भारतात निर्मिती करण्यात आलेल्या विमानांची त्यांनी माहिती घेतली. तसंच नौदल अधिकाऱ्यांशी चर्चा ही केली होती.